सामान्यांचे जीवन सुसह्य करणार : जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

भाजप जगातील सर्वांत जास्त सभासद असणारा राजकीय पक्ष आहे. सध्या भाजपची सभासदसंख्या 11 कोटी आहे. या वर्षी ती आणखी सात कोटीने वाढविण्याचा संकल्प आहे.

पुणे : मागील 50 दिवसांत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सक्षम करून त्यांचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्यामुळे मोदी सरकारला मोठा पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघात सभासद नोंदणी अभियान प्रसंगी जावडेकर बोलत होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे, हर्षाली माथवड, मंडल अध्यक्ष प्रकाश बालवडकर, अजय मारणे आदी या वेळी उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, "भाजप जगातील सर्वांत जास्त सभासद असणारा राजकीय पक्ष आहे. सध्या भाजपची सभासदसंख्या 11 कोटी आहे. या वर्षी ती आणखी सात कोटीने वाढविण्याचा संकल्प आहे. जनतेमध्ये जाऊन सभासदांची नोंदणी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. यातून जनतेची पक्षाशी असलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न आहे.'' 

भाजपने प्रत्येक घरात शुद्ध पाणी देण्याची योजना सुरू केली आहे. काँग्रेसने गरिबीचे समान वाटप केले, तर भाजप सरकार समृद्धीचे समान वाटप करीत आहे. हा या दोन पक्षांचा राज्यकारभारातील फरक आहे. 
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will make life normal says Javadekar