शिवसेना बारामती मतदारसंघात लढणार का?

मिलिंद संगई
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

युतीचे अजून निश्चित नसताना बारामती विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याची घोषणा सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे यांनी केली आहे.

बारामती शहर : युतीचे अजून निश्चित नसताना बारामती विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याची घोषणा सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे यांनी केली आहे. एकीकडे युती होणार अशी चिन्हे दिसत असतानाच शिवसेनेच्या वतीने मात्र राज्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरु आहे. 

बारामती विधानसभा मतदारसंघासाठीही काल इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर बारामती मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिल, अशी शक्यता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अँड. राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली. काल मुंबईत काळे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास मांढरे यांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या. 

युतीच्या वाटपात बारामती मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. भाजपनेही या मतदारसंघावर दावा सांगत चाचपणी सुरु केली आहे. भाजपच्या वतीनेही इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत, त्या मुळे शिवसेनेनेही या मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आपलाच या मतदारसंघावर दावा असल्याचे दाखवून दिले आहे. 

युती झाली तर पक्षप्रमुख सांगतील त्या नुसार निर्णय होईल, मात्र युती झालीच नाही तर ऐनवेळी धावपळ नको या भूमिकेतूनच या मुलाखती झाल्याचेही सांगितले गेले. भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांकडून युती नकोच, स्वबळावरच लढू असा सूर उमटत आहे, मात्र स्वतंत्र लढण्यानंतर तोटा होऊ नये मतांची विभागणी होऊन इतर पक्षांना त्याचा फायदा होऊ नये याचीही काळजी घेतली जावी असाही कार्यकर्त्यांचा सूर आहे. 

बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना तयार आहे. पक्षप्रमुख आदेश देतील त्या नुसार आम्ही निर्णय घेऊ, मात्र बारामती मतदारसंघ शिवसेनेनेच लढावा अशी आमची भावना आम्ही उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातली आहे - अँड. राजेंद्र काळे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Shiv Sena contest in Baramati constituency?