बुडालेल्या महिलेसाठी वायरमन ठरला देवदूत 

जनार्दन दांडगे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

उरुळी कांचन येथील नवीन मुठा कालव्याच्या भरावावर असलेल्या रस्त्यावरून जाताना मोटारसायकलसह पाण्यात पडून बुडत असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला वायरमनने प्रसंगावधान राखत थेट पाण्यात उडी मारून जीवदान दिले.

उरुळी कांचन (पुणे) : येथील नवीन मुठा कालव्याच्या भरावावर असलेल्या रस्त्यावरून जाताना मोटारसायकलसह पाण्यात पडून बुडत असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला वायरमनने प्रसंगावधान राखत थेट पाण्यात उडी मारून जीवदान दिले.

अनिता विद्याधर पवार (वय 45, रा. बोरीभडक, ता. दौंड) असे कालव्यात बुडणाऱ्या महिलेचे नाव असून, प्रकाश पांडुरंग माकर (वय 30, रा. सहजपूर, ता. दौंड) असे या देवदूत ठरलेल्या वायरमनचे नाव आहे. 

अनिता पवार यांची उरुळी कांचन येथील खेडेकरमळा परिसरात शेती आहे. त्या सोमवारी (ता. 7) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून नवीन मुठा कालव्याच्या भरावावरच्या रस्त्यावरून शेतात जात होत्या. त्या वेळी त्या मोटारसायकलसह कालव्यात पडल्या. मात्र, त्यांना पोहता येत नव्हते. त्यात कालवा तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे त्या डोक्‍यापेक्षाही अधिक पाण्यात बुडाल्या. त्यांनी शेवटची संधी म्हणून हाताचा पंजा पाण्याबाहेर काढून हलविण्यास सुरवात केली.

त्याचवेळी माकर हे खेडेकर मळ्यातील एका शेतकऱ्याची वीज जोडण्यासाठी तेथून निघाले होते. त्यांना कालव्याच्या मध्यभागी पाण्यात हालचाल होत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी त्याकडे बारकाईने पाहिले. त्यांना मानवी हात असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पाण्यात उडी घेतली आणि ते त्या हाताजवळ पोचले. त्यांनी हाताला ताकदीने पकडून त्यांना कालव्याच्या भरावावर आणले. मात्र, नाकातोंडात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळे अनिता यांची अवस्था अतिशय गंभीर झाली होती. त्यामुळे माकर यांनी तत्काळ वीज वितरण कंपनीमधील सहकारी व ग्रामस्थांशी मोबाईलवरून संपर्क केला. त्यानंतर अनिता यांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात हलविले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. 

कस्तुरी प्रतिष्ठानकडून सत्कार 
माकर यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनिता पवार यांना पाण्यातून काढण्यापासून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यापर्यंत सर्वच गोष्टी तत्काळ केल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. याबद्दल उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी त्यांचा सत्कार केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wireman rescues woman drowned in canal in Pune