शिरूरमधील रस्त्यांची महिन्यात उखडली खडी 

युनूस तांबोळी
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

शिरूर तालुक्याच्या पश्‍चिम भागात नव्याने केलेल्या रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, एक महिन्यात खडी उखडून रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी या कामाकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहेत. 

टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्याच्या पश्‍चिम भागात नव्याने केलेल्या रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, एक महिन्यात खडी उखडून रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी या कामाकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहेत. 

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ते टाकळी हाजी हे दोन्ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. त्यांना दळणवळणासाठी जोडणारा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. या रस्त्याचे नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खडीकरण करण्यात आले आहे होते. मात्र, अवघ्या महिनाभरात हा रस्ता पुन्हा उखडला.

फाकटे ते कवठे हा रस्ता देखील खडीकरणानंतर काही दिवसांनी उखडला. मलठण ते कवठे येमाई या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मलठण व कवठे येमाई येथील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. त्यामुळे येथे अपघात घडण्याची शक्‍यता आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.

या परिसरातून अष्टविनायक रस्त्याचे काम सुरू होणार आहे. दुरवस्था झालेल्या कामाप्रमाणे अष्टविनायक रस्त्याचे काम होऊ नये, यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन कामाकडे लक्ष दिले पाहिजे. 
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बी. एम. चौरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within a month, the streets of Shirur are cramped