'आधार'शिवाय स्वस्त धान्य आणि रॉकेल नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - रेशन दुकानातून धान्य आणि रॉकेल मिळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार आणि मोबाइल क्रमांकाची दुकानदारांकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. अन्नधान्य वितरण विभागाने त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.

पुणे - रेशन दुकानातून धान्य आणि रॉकेल मिळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार आणि मोबाइल क्रमांकाची दुकानदारांकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. अन्नधान्य वितरण विभागाने त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.

ऑक्‍टोबरअखेर मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक सादर न केलेल्या शिधापत्रिकाधारकांचा रॉकेलपुरवठा खंडितही केला आहे. राज्य शासनाने 13 ऑक्‍टोबर 2016 रोजी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुकानदारांचे नाव, अनुक्रमांक, नोंद वहीतील संदर्भ क्रमांक, शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची नावे, त्यांचे आधार क्रमांक, कुटुंब प्रमुखाचा मोबाइल क्रमांक, बॅंकेचे नाव, शाखा, तसेच खाते क्रमांक आणि दरमहा वितरित होणारे रॉकेल याची माहिती स्वस्त धान्य दुकानदारांकडून संकलित करण्यात येणार आहे. ही माहिती प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. त्यामुळे सरकारी धान्य आणि रॉकेलच्या काळ्याबाजाराला आळा बसून ते पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. आधार क्रमांक न दिलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या रॉकेलचा कोटा 31 जानेवारी 2017 पर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आधार क्रमांक दिलेल्या लाभार्थ्यांनाच रॉकेल व धान्यपुरवठा करण्यात येऊन उर्वरित कार्ड रद्द करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्न पुरवठा अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.

ते म्हणाले, 'शहरात सुमारे अकराशे केरोसीन परवानाधारक आहेत. एका व्यक्तीच्या शिधापत्रिकेसाठी दोन लिटर, दोन व्यक्तींसाठी तीन लिटर आणि तीनपेक्षा अधिक सदस्य असलेल्या शिधापत्रिकेवर 4 लिटर याप्रमाणे अनुदानित रॉकेल वितरित केले जाते.'

Web Title: without aadhar card not cheap grain and kerosene