लांडग्याला प्रथमच ‘जीपीएस कॉलर’

Wolf
Wolf

पुणे - लांडगा म्हटले की, आपल्याला गोष्ट आठवते ती ‘लांडगा आला रे आला’ची! लहानपणापासून गोष्टीत आवर्जून आलेल्या या लांडग्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या परिसरातील दोन आणि सोलापूरच्या नानल भागातील एका लांडग्याला प्रथमच ‘जीपीएस कॉलर’ बसविण्यात आली आहे. 

सासवडला जाताना दिवे घाट चढल्यानंतर सुरू होते ते माळरान! सासवड, जेजुरी असा सुप्यापासून ते बारामतीपर्यंतचा भाग असाच माळरानाचा. पुण्यापासूनच तासा-दीड तासाच्या अंतरावरचा हा भाग; पण तो आहे या लांडग्यांचा अधिवास. गोष्टीत लबाडी करणारा हा लांडगा प्रत्यक्षात मात्र गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या नियंत्रकाची भूमिका बजावतो. या भागात आता नागरीकरणाचा वेग वाढला आहे. रस्त्यांवर वाहनांची रहदारी वाढत आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळासारखे विकास प्रकल्प याच परिसरात निर्माण होत आहेत. त्याचा लांडग्यांच्या आधिवासावर नेमका कसा परिणाम होत आहे, याचा शास्त्रीय अभ्यास आतापर्यंत झालेला नाही. हा अभ्यास करण्यासाठी लांडग्याचा प्रत्येक क्षणाला ठाव-ठिकाण कळणे आवश्‍यक ठरते. त्यामुळे ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या शास्त्रज्ञांनी पुणे परिसरातील दोन आणि सोलापूरच्या नानल भागातील एका लांडग्याला जीपीएस ‘कॉलर’ बसविली आहे. 

याबाबत लांडग्यांचे अभ्यासक मिहीर गोडबोले म्हणाले, ‘‘पुणे विभागात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या कॉलर बसविण्यात आल्या आहेत. यापूर्वी वन्यजीव शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी नानल येथे २००२-०३ मध्ये लांडग्यांना कॉलर लावल्या होत्या. त्या कॉलर या साध्या होत्या. त्यांचा सिग्नल अँटेनावरून मिळतो आणि त्यातून प्राण्याचा माग घेता येतो; परंतु ‘जीपीएस कॉलर’मधून प्राण्याच्या नेमक्‍या ठावठिकाण्याची अचूक माहिती मिळते. या प्रकारच्या कॉलर प्रथमच भारतातील लांडग्यांवर बसविण्यात आल्या आहेत.’’

कॉलर का केले आहे? 
लांडग्यांच्या सुरक्षेसाठी भविष्यात नेमके धोरण आखण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांचा नेमका अधिवास माहिती असणे आवश्‍यक आहे. ते कोणत्या भागाला वास्तव्यास प्राधान्य देतात आणि पिलांना जन्म देताना कोणत्या प्रकारचा प्रदेशाची ते निवड करतात, याची अचूक माहिती असल्याशिवाय लांडग्यांचे संवर्धन करता येणार नाही. 

पुढे काय होणार?
लांडग्यांच्या कॉलरमधून मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण शास्त्रज्ञ करणार आहेत. त्यातून ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ लांडग्यांच्या संवर्धनासाठी नेमकी कोणती पावले टाकावी लागतील, याचे मार्गदर्शन वन खात्याला करेल.

पुण्यातील दोन लांडग्यांना कॉलर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी नानल येथे लांडग्यांना कॉलर करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे; परंतु पुण्याच्या परिसरातील लांडग्यांना प्रथम कॉलर बसविण्यात आली आहे. 
- रवी वानखेडे, वनसंरक्षक, पुणे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com