ती कोसळली... उठली अन्‌ जिंकलीही

Aids
Aids

पुणे - नवऱ्याचं निधन होऊन उणेपुरे दोनच महिने झालेले, पोटात बाळ... आणि अशातच आभाळ कोसळावं तशी एड्‌सच्या भयानक आजाराची झालेली उकल. डॉक्‍टरांचे शब्द ऐकून ती तनमनानं कोसळलीच. त्यात भरीस भर ती शेजाऱ्या-पाजऱ्यांच्या विखारी नजरा अन्‌ पदोपदी ऐकावी लागणारी दूषणं; पण पोटात वाढणाऱ्या गोळ्यासाठी ती खंबीर बनली. साऱ्यांना पुरून उरत... या जर्जर रोगावर मात करत ती आज समाजात ताठ मानेनं वावरतेय.

...निशा गंधे (नाव बदलले आहे.) हीच ती लढवय्यी. नुकत्याच झालेल्या जागतिक एड्‌स दिनाचे औचित्य साधून तिच्याशी संवाद साधला. अमका-तमक्‍याला एड्‌स झालाय, याची नुसती कुणकूण लागली तरी समाजात त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बदलतो, याचा प्रत्यय तिच्या शब्दाशब्दांतून येत होता.   

निशा २००५ मध्ये बोहल्यावर चढली. लग्नाला सहा वर्षे होतात न होतात तोच तिच्या पतीचं निधन झालं. एड्‌सनंच त्याचं आयुष्य संपवलं. त्याच वेळी निशा गरोदर होती. तिने स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली तेव्हा तिलाही एड्‌स असल्याचे निदान झाले. डॉक्‍टरांनी हे सांगताच ती पुरती कोसळली. पोटातल्या बाळालाही हा आजार होण्याची शक्‍यता होती; परंतु डॉक्‍टरांनी तिची समजूत काढून उपचार करण्यास सुरवात केली. 

हा आजार झाल्याचे समजताच समाजातून तिला हीन वागणूक मिळू लागली. कुटुंबातील लोकही तिचा दुस्वास करू लागले. यामुळे खचलेल्या निशाने औषधे बंद करून मरणाचीच वाट धरली; पण डॉक्‍टर आणि मैत्रिणींनी तिला धीर दिला. त्यातून तिनं पुन्हा औषधे सुरू केली. काही महिन्यांतच बाळाचा जन्म झाला. सुदैवाने बाळ निरोगी जन्माला आले.

त्यानंतर मात्र तिने जगण्याची उभारी बांधली. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वेळच्या वेळी औषधे घेतल्याने ती या आजारातून पूर्णपणे बरी झाली. आता ती आपल्या चिमुरड्यासह आनंदी आयुष्य जगतेय. ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश ती इतरांना देतेय.

पूर्वी एड्‌सग्रस्त रुग्ण दगावण्याची शक्‍यता अधिक असायची. आता यावरील औषधोपचाराच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. योग्य वेळी औषधोपचार घेतल्यास रुग्ण निरोगी आयुष्य जगू शकतो.
- डॉ. अमित द्रविड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com