धक्कादायक प्रकार : येरवड्यात क्वारंनटाईन सेंटरमध्ये महिलेचा उपचाराअभावी मृत्यू

daund.jpg
daund.jpg

विश्रांतवाडी : कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली. आशा पुरुषोत्तम पाटील (वय 45, रा. चौधरीनगर, मुंजाबा वस्ती, धानोरी) यांचा मृत्यू झाला.

या गंभीर घटनेमुळे महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरची दुरवस्था, रुग्णांना मिळणार्या सोयी-सुविधांचा तसेच उपचारांचा अभाव या गोष्टी समोर आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या उपचाराअभावी झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी येरवडा नागरिक कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे आशा पाटील या पती पुरुषोत्तम पाटील यांना  बुधवारी दुपारी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे उपचारांसाठी पाठवण्यात आले होते. बुधवारी रात्रीपासून त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यांना तिसऱ्या मजल्यावर महिला कक्षामध्ये एका खोलीत ठेवण्यात आले होते. त्यांचे पती पुरुषोत्तम पाटील हे दुसऱ्या मजल्यावर होते. आशा पाटील यांना रात्रभर त्रास सुरू होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना धाप लागून त्या बेशुद्ध झाल्या. याठिकाणी तिसऱ्या मजल्यावर ऑक्सिजन तसेच आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना चादरीमध्ये गुंडाळून इतर रुग्णांच्या मदतीने तळमजल्यावरील ऑक्सीजन रूममध्ये आणण्यात आले. जिन्यातून ऑक्सीजन रूमकडे येतांना गेट कुलूप लावून बंद असल्यामुळे कुलूप तोडावे लागले. ऑक्सीजन रूममधील ऑक्सिजन लावण्यासाठी आवश्यक साधने वेळेवर उपलब्ध नव्हती. कोरंनटाईन सेंटर बाहेर रुग्णवाहिका नसल्यामुळे सुमारे अर्धा तास वाया गेला. पावणे एक वाजण्याच्या सुमारास बेशुद्धावस्थेत त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. 

पुणे महापालिकेने येरवड्यात संत ज्ञानेश्वर वसतिगृह याठिकाणी पॉझिटिव रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये  उपचार केले जातात. मात्र या ठिकाणी आवश्यक कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. उपलब्ध असणारे डॉक्टर  रुग्णांना आवश्यक ते उपचार व मदत करत नाहीत. गंभीर बाब म्हणजे ऑक्सिजन बेड व वेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे अशा गंभीर रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे.

या घटनेमुळे क्वारंनटाइन सेंटरमधील इतर रुग्ण धास्तावले असून रुग्णासह त्यांचे नातेवाईक यांनी या ठिकाणी मिळणाऱ्या उपचारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी येरवडा नागरिक कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com