मानलेल्या भावाकडून हिंगण्यात महिलेचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

मानलेल्या भावाकडे बारा वर्षे ठेवलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी मागितल्याने मानलेल्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात घडली. 

पुणे - मानलेल्या भावाकडे बारा वर्षे ठेवलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी मागितल्याने मानलेल्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात घडली. 

कस्तुरी शेखर माने (वय 45, रा. शिवपार्वती बंगला, साईनगर, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रज्वल शेखर माने (वय 19) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रवींद्र श्रीनिवास जालगी (रा. बराटे चौक, कर्वेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

शेखर हे नृत्यदिग्दर्शक आहेत. त्यांची बहीण लावण्या हिच्या लग्नासाठी आईने मानलेला भाऊ रवींद्र याच्याकडे पैसे साठवत होत्या. दहा ते बारा वर्षांमध्ये त्यांनी 14 ते 15 लाख रुपयांची रक्कम जालगीकडे दिली होती. दरम्यान, बहिणीचे लग्न नुकतेच ठरल्याने शेखर यांच्या आईने जालगीकडे ठेवण्यासाठी दिलेले पैसे मागितले. मात्र, जालगी वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. दरम्यान, याच कारणावरून शुक्रवारी शेखर यांची आई व जालगी यांच्यात भांडणे झाली. त्या वेळी जालगीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचे नाटक करून शेखर यांच्या आईस घाबरवले. "यापुढे तू माझ्याकडे पैसे मागितले, तर दोघांपैकी एक जण मरणार', अशा शब्दांत त्याने धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेखर कामानिमित्त घराबाहेर गेले असता, जालगीने घरी येऊन त्यांच्या आईचा गळा दाबून खून केला. 

Web Title: woman murder from her brother in pune