महिला सरपंचाच्या पतीचा मृत्यू

महिला सरपंचाच्या पतीचा मृत्यू

पुणे - ग्रामपंचायत निवडणूक व जमिनीच्या वादावरून महिला सरपंचाच्या पतीला कारने धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी मृत्यू झाला. ही घटना १३ मार्चला पहाटे साडेपाच वाजता आंबेगाव खुर्द येथे घडली होती.

बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा. नऱ्हेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मीनाक्षी बाळासाहेब वनशिव यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी माजी उपसरपंच अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा. विठ्ठल कलावती निवास, नऱ्हे गाव) याच्यासह नितीश कैलास थोपटे (वय ३०, रा. धायरी) यांना अटक केली. 

फिर्यादी या नऱ्हेगावच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वनशिव यांच्याविरुद्ध कांबळे याची पत्नी सरपंचपदासाठी उभी होती. वनशिव यांनी त्यांचा पराभव करून त्या सरपंच झाल्या होत्या. त्या वेळी कांबळे याने फिर्यादीच्या पतीला ‘तुला बघून घेऊ’ अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर जमिनीवरूनही त्यांचे वाद सुरू होते. दरम्यान, बाळासाहेब वनशिव व त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर हे नेहमीप्रमाणे १३ मार्चला पहाटे साडेपाच वाजता मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे फिरायला गेले होते त्या वेळी त्यांच्याभोवती एक पांढऱ्या रंगाची कार फिरताना निदर्शनास आली. याच कारने वनशिव यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. वनशिव यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध खुनाच्या कलमांची वाढ केल्याचे भारती विद्यापीठ ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले. 

अन्य आरोपींकडे दुर्लक्ष
वनशिव यांना जिवे मारण्याच्या प्रकरणामध्ये कांबळे व थोपटे यांच्यासह आणखी सात आरोपींचा सहभाग आहे; परंतु भारती विद्यापीठ पोलिसांनी केवळ दोघांनाच अटक करून अन्य आरोपींना अटक करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वनशिव कुटुंबीयांनी केला; तसेच बाळासाहेब वनशिव यांचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com