अरे बापरे ! भाजीविक्री करणाऱ्या आजींना झाली कोरोनाची लागण अन् मग...

Coronavirus.jpg
Coronavirus.jpg

किरकटवाडी (पुणे) : किरकटवाडी (ता. हवेली) येथील एका 69 वर्षीय भाजी विक्री करणार्‍या आजींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता सध्या किरकटवाडी, खडकवासला, नांदेड या परिसरात दिसून येत आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मार्केटमध्ये येणारा शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहक मिळत नाहीत म्हणून कमी दराने खरेदी करायचा आणि मार्केटमध्ये भाजीपाला मिळत नाही असे म्हणून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने विकायचा असा भाजी विक्रेत्यांचा धंदा तेजीत सुरू होता. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि ग्राहकांची लूट झाली. सध्या नांदेड,किरकटवाडी, खडकवासला या तीनच गावांचा विचार केला तर जुने व नवीन मिळून 200 च्या पुढे भाजीविक्रेते तयार झालेले आहेत.

भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना दिसत नाही. भाजी विक्रेत्यांच्यासमोर असलेली गर्दी एकाच वेळी भाजी हाताळताना दिसते. अनेक भाजीविक्रेते मास्क अथवा सॅनिटायझर वापरताना दिसत नाहीत. प्रतिबंधित क्षेत्रातून भाजी विक्रेते टेम्पो अथवा हातगाड्या घेऊन सोसायट्यांमध्ये फिरून भाजी विक्री करतात. भाजी विक्रेत्यांकडून दुकाने बंद करण्यासंदर्भात असलेल्या वेळांचे पालन होत नाही. अशा अनेक कारणांमुळे शहराला लागून असलेल्या या गावांमध्ये रुग्णसंख्या आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायतींकडून मास्क न वापरणारे नागरिक व दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडूनही नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु तरीही नागरिक व व्यावसायिक यांच्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. बेजबाबदार नागरिक व व्यवसायिक यांच्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, रुग्णसंख्या वाढत असलेल्या गावांसाठी वेगळी नियमावली तयार करून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली आहे. दरम्यान किरकटवाडी,नांदेड, खडकवासला या गावांची रुग्ण संख्या आता 72 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये किरकटवाडी येथील 15, नांदेड येथील 29 व खडकवासला येथील 28 रुग्णांचा समावेश आहे.
   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"रस्त्याच्या कडेला उघड्यावर कोणालाही भाजी विक्री करता येणार नाही असे प्रशासनाचे आदेश आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे"

- अशोक शेळके, पोलिस निरीक्षक हवेली पोलिस स्टेशन.


      "मास्क न लावणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून नागरिकांनी भाजी खरेदी करु नये. नागरिकांनी आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्यासाठी खबरदारी घ्यायलाच हवी,"

-डॉ. वंदना गवळी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com