महिला व्होट बॅंकेवर काँग्रेसचा भर - देव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढील काळात ‘महिला व्होट बॅंक’ मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर राहील, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार सुश्‍मिता देव यांनी सोमवारी पुण्यात सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांना संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

पक्षाच्या महिला आघाडीची कामगिरी जाणून घेण्यासह पक्षाचा नवा अजेंडा त्यांच्यापुढे मांडण्यासाठी देव पुण्यात आल्या आहेत. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला काँग्रेसच्या सचिव सोनल पटेल, प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सोनाली मारणे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी उपस्थित होत्या. 

देव म्हणाल्या, ‘‘काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कायदेविषयक जागृतीसाठी ‘हमारा हक’ मोहीम राबविण्यात येणार आहे. पंधरा ते तीस वयोगटातील युवतींच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी प्रियदर्शनी गटाची स्थापना केली आहे.’’

सरकारविरोधात आक्रमक होण्याचे आवाहन
आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आक्रमक होण्याचे आवाहन देव यांनी आघाडीच्या बैठकीत केले. सरकारचा कारभार लोकांपर्यंत पोचवून काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी आघाडीने स्वतंत्र कार्यक्रम तयार केला असून, तो राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार प्रणिती शिंदे, आदिती सिंग, संगीता तिवारी, सुशिबेन शहा आदी उपस्थित होत्या.

Web Title: Woman Vote bank Congress Sushmita Dev