महिलांचा वाढतोय योग शिक्षणाकडे कल

अवधूत कुलकर्णी
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पिंपरी - धावपळीच्या युगात नोकरी आणि घर सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी महिलांचा कल योग वर्गांकडे वाढल्याचे चित्र आहे. सुरवातीला नगण्य असणारे हे प्रमाण आता ६० ते ७० टक्‍क्‍यांवर गेले आहे.

पिंपरी - धावपळीच्या युगात नोकरी आणि घर सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी महिलांचा कल योग वर्गांकडे वाढल्याचे चित्र आहे. सुरवातीला नगण्य असणारे हे प्रमाण आता ६० ते ७० टक्‍क्‍यांवर गेले आहे.

पतंजली योग समिती पिंपरी-चिंचवडचे सहप्रभारी डॉ. अजित जगताप म्हणाले, ‘‘२००५ मध्ये संस्थेच्या वतीने शहरात योगप्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. सध्या आमच्या शंभर वर्गांमधून दीड हजार जण योग प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील महिलांचे प्रमाण सातशेहून अधिक आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये वेगाने आरोग्यविषयक जागृती वाढत आहे.’’

योगविद्या पिंपरी-चिंचवडचे केंद्रप्रमुख प्रमोद निफाडकर यांनी सांगितले, ‘‘संस्थेने शहरात २४ वर्षांपूर्वी योग वर्ग घेण्यास सुरवात केली. केवळ १० ते १२ योगशिक्षक होते; तसेच चिंचवड आणि आकुर्डी येथे असे दोन योग वर्ग होते. सध्या एक हजार योगशिक्षक असून, त्यामधून सुमारे १० ते १५ हजार जण प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे.’’
भारतीय योगसंस्थान या संस्थेच्या चिंचवडच्या उपकेंद्र प्रमुख माधुरी कवी यांनी सांगितले, ‘‘आमचे ३० ते ३५ वर्षांपासून वर्ग सुरू आहेत. यामध्ये दीडशे ते दोनशे पुरुष, तर अडीचशे ते तीनशे महिला प्रशिक्षण घेत आहेत.’

वाढते वजन नियंत्रित करणे, रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे यांसह शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी महिलांचा योग वर्गांना चांगला प्रतिसाद आहे. घर व करिअर सांभाळतानाही महिलांची योग वर्गांना नियमित उपस्थिती असते. 
- डॉ. अजित जगताप, सहप्रभारी, पतंजली योग समिती 

Web Title: Woman Yoga Class Education