पिंपरी परिसरात महिलांवरील वाढते अत्याचार चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

'ज्येष्ठांसाठी कक्ष स्थापन करा'
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात तातडीने ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात यावा. प्रत्येक शाळेत विशेष बाल पथक नेमण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पीएमपीएल बस, निर्जन चौकांसह आवश्‍यक ठिकाणी महिला पोलिस साध्या वेशात तैनात करावेत. या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा शस्त्रांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत असून, याच्या मुळापर्यंत जाऊन आरोपींना अटक करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

पुणे - पिंपळे सौदागर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झाल्याची घटना, तसेच पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्‍त केली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी आवश्‍यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झाल्याप्रकरणी डॉ. गोऱ्हे यांनी गुरुवारी पुणे विभागीय आयुक्‍तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील महिला अत्याचार आणि इतर गुन्ह्यांचा आढावा घेतला. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपींना अटक केली असून, लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यांत बलात्काराच्या 40 घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांमधील 39 आरोपींना अटक केली आहे, तर 27 खुनाचे गुन्हे दाखल झाले असून, आतापर्यंत 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यांतील आरोपींना अटक केल्याच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करतानाच महिलांवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत मात्र डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Atrocity Crime Police Care Neelam Gorhe