तुरुंगातल्या पैठणीची महिलांना भुरळ

दिलीप कुऱ्हाडे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैदी बनवत असलेल्या पैठणी साडीला सध्या प्रतीक्षा यादी लागली आहे. महिलांची सर्वाधिक पसंत असलेली पैठणी कारागृहाच्या विक्री केंद्रात बाजारभावापेक्षा तीन ते चार हजार रुपयांनी कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चोवीस  पैठणी साड्या विक्री केल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिली.

कारागृहातील हातमागावर दोन कैदी पैठण तयार करण्यात व्यस्त आहेत. त्यांना एक साडी तयार करण्यासाठी दोन महिने लागतात. पैठणीसाठी रंग संगती, पॅटर्नचे मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रशिक्षक आहे. शहरातील कापड दुकानांमध्ये मिळणारी पैठणीची किंमत पंधरा ते सोळा हजार रुपये आहे. मात्र कारागृहातील पैठणीची किंमत दहा ते बारा हजार रुपये आहे. कारागृहाच्या विक्री केंद्रावर पैठणीला मोठी मागणी आहे. त्यामुळे पैठणी खरेदी करणाऱ्यांची प्रतीक्षा यादी तयार केली आहे. 

कैद्याला रोज ६५ रुपये 
कारागृहाच्या ब्रीद वाक्‍याप्रमाणे ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ अंतर्गत कैद्यांना अनेक उद्योगात गुंतवून ठेवले आहे. कारागृहाच्या नियमाप्रमाणे काम करणाऱ्या कैद्यांना प्रतिदिन ६५ रुपये पगार दिला जातो. पैठणी करणाऱ्या कैद्यांनासुद्धा रोज ६५ रुपये वेतन दिले जाते. मात्र हेच कैदी बाहेर पडल्यानंतर चांगले पैसे मिळवू शकतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची ‘सुधारणा व पुनर्वसन’ झाल्याचे समाधान असेल, असे स्वाती साठे यांनी सांगितले. 

येरवडा मध्यवर्ती कारागृहात दोन कैदी एकाच हातमागावर पैठणी तयार करतात. त्यामुळे दोन महिन्याला एक पैठणी तयार होते. अनेक प्रसिद्ध व्यक्तींपासून मध्यमवर्गीयांनीसुद्धा कारागृहातील पैठणी खरेदी केल्या आहेत. सुरवातीला मागणीप्रमाणे पैठणी तयार करीत होतो. मात्र आता मागणी वाढल्याने प्रतीक्षा यादी तयार करावी लागली आहे. 
- स्वाती साठे, उपमहानिरीक्षक, कारागृह 

Web Title: women attracted to paithani saree made by in jail