दिल्लीतील महिला डॉक्‍टरांची साडेसहा लाखांची फसवणूक

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - पुण्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयात "एमडी'साठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने नवी दिल्लीतील दोन महिलांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अभिषेक, रुद्रप्रताप आणि महंमद नासीम (पूर्ण नाव व पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. नवी दिल्लीतील सुभाषनगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय डॉक्‍टर तरुणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही घटना ऑगस्ट 2019 मध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्‍टर तरुणी आणि त्यांच्या दोन मैत्रिणींचे बीएएमएसचे शिक्षण झाले आहे. त्यांना त्यापुढे "एमडी'चे शिक्षण घ्यायचे असल्याने या डॉक्‍टरने पुण्यात अभिषेक याच्याशी फोनवरून चौकशी केली. त्या वेळी त्याने हडपसर भागातील आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ शकतो, असे सांगितले. त्या तिघींनाही पुण्यात भेटण्यासाठी बोलावले.

तक्रारदार डॉक्‍टर आणि त्यांची एक मैत्रीण पुण्यात आल्यावर अभिषेकने त्यांना कल्याणीनगर भागातील कार्यालयात बोलावून घेतले. तुमचा प्रवेश निश्‍चित झाल्याचे सांगून डॉक्‍टरकडून अडीच लाख, तर त्यांच्या मैत्रिणीकडून चार लाख, असे एकूण साडेसहा लाख रुपये घेतले. मात्र, प्रवेश मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक निरीक्षक बलभीम ननावरे करीत आहेत.

नोटा तपासायला गेले अन्‌ झाले गायब
या दोघींनी दिलेले साहेसहा लाख रुपये रोख असल्याने त्यातील नोटा बनावट निघण्याची शक्‍यता संशयितांनी वर्तविली. या नोटा तपासून आणून देतो, असे त्यांना सांगून संशयित तेथून निघून गेले. चार तास वाट पाहूनही ते परत आले नाहीत. त्यांच्याशी संपर्कही होत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली असता, ते कार्यालय भाड्याने घेतलेले असून, त्याचा भाडेकरारही झालेला नसल्याची माहिती पुढे आली. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com