महिला, मुलींमधील भय संपता संपेना!

Crime
Crime

पौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड, संतापाची भावना आहे. अशा घटना टाळता येऊ शकत नाहीत का, कोथरूडमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत का, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले.

सुतारदरा, किष्किंधानगर, लोकमान्य वसाहत, जयभवानीनगर, केळेवाडी, लक्ष्मीनगर अशा सतरा मोठ्या झोपडपट्टीचा भाग कोथरूडमध्ये आहेत. येथे राहणाऱ्या महिला या प्रामुख्याने मजुरी, धुणीभांडी काम करणाऱ्या आहेत. कामाला जाताना त्यांना आपली लहान मुले घरीच ठेवून जावे लागते. घरात मुलांना कोंडून कामाला जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. पोटापाण्यासाठी हे करावे लागते, असे या महिला सांगतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही असे करतो, असे त्यांचे म्हणणे आहे. काही जण शेजार-पाजारच्यांच्या व नातेवाइकांच्या भरवशावर मुले ठेवतात; पण अशा काही घटना घडल्या की ही कुटुंबे हादरून जातात. पोट भरायचे की मुलांच्या सुरक्षिततेचे पाहायचे, या विवंचनेत ही कुटुंबे असतात. छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी वयाने जरा मोठ्या असलेल्या भावंडांना शाळा सोडावी लागते.

मतिमंद मुलीवर बलात्कार, शाळेतील शिपायाने अल्पवयीन मुलींना अश्‍लील फिल्म दाखवली, महाविद्यालयीन युवतींना मारहाण ही काहीशी जुनी प्रकरणे कोथरूडकर विसरले असतानाच या कोथरूड भागात बलात्काराच्या चार तक्रारी नोंदवण्यात आल्या. यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे. घरगुती हिंसाचार, महिलांना मारहाण, मुलींची छेडछाड असे प्रकार रोजच घडतात. त्यातील क्वचित काही तक्रारी पोलिसांकडे येतात. बहुतांशी प्रकरणात समज देत, समझोता करून प्रकरण मिटविण्यात येते. जी प्रकरणे मिटवण्याजोगी नसतात, ती कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात चालत राहतात. महिलांच्या सुदैवाने कोथरूडला पोलिस निरीक्षक म्हणून महिला अधिकारी प्रतिभा जोशी यांची नुकतीच निवड झाल्यामुळे महिलांना आपल्या भावना अधिक मोकळेपणाने मांडता येणे शक्‍य होणार आहे. हे सर्व असले तरी महिला अत्याचाराचे प्रमाण कमी कसे करता येईल, हे पाहणे आवश्‍यक आहे.

सध्या अनेक शाळा व किशोरवयीनांमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या वतीने वस्ती पातळीवर गुड टच- बॅड टचसारखे जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा उपयोग अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी होत आहे. 
सुतारदरा येथील गुंडांची दहशत कमी व्हावी, गाड्यांची तोडफोड, रोजच्या हाणामाऱ्या या प्रकारांना आळा बसावा म्हणून पोलिस मित्र संघटनेचे संदीप कुंबरे २०११ पासून या भागात पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी करत आहेत; परंतु जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत या मागणीला टोलविले जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सोनिया गोफण म्हणाल्या की, बरेचदा त्रास होत असला तरी महिला बोलत नाहीत. थोड्याफार शिकलेल्या महिलांना असे वाटते की, आपल्या भांडणाचा मुलांच्या भवितव्यावर परिणाम होईल. काही महिला इतक्‍या काम करत असतात की त्यांना आपले दुःख व्यक्त करायलासुद्धा वेळ मिळत नाही. मनातल्या मनात कुढत राहतात. सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीतून सुटत नाहीत.

आम्ही महिला व मुलींमध्ये काम करतो. खरी जनजागृती ही पुरुष व महाविद्यालयीन युवक, बेरोजगार तरुणांमध्ये करण्याची गरज आहे. आम्ही जेव्हा बैठका घेतो, त्या वेळी महिला हजर असतात; पण पुरुष येत नाहीत. पुरुष महिलांवर अनेक बंधने लादतात. त्यांना योग्य समज देऊन जनजागृती करण्याची गरज आहे. 
- गौरी सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या 

श्रीगणेश महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही येथील मुलींसाठी तायक्वांदो, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण सुरू केले. त्यामध्ये शिक्षक अलीम शेख यांची मोठी मदत मिळते. आज पस्तीसहून अधिक मुली आमच्याकडे शिकत आहेत. 
- राणी परदेशी, रहिवासी, सुतारदरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com