प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने महिला, तरुणींना संकटकाळात तत्काळ मदत मिळावी, यासाठी देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये "महिला साह्यता कक्ष' सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने "निर्भया फंड'च्या अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे महिलांना सुरक्षित वातावरण व खंबीर साथ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

दिल्ली, हैदराबाद, उन्नाव येथील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह विभागाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये महिला साह्यता कक्ष स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने या कक्षाची निर्मिती व त्यास चालना देण्यासाठी गृह मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

महिला साह्यता कक्षात महिलांचे प्रश्‍न समजून घेत ते सकारात्मक पद्धतीने सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पीडित महिलांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच ठिकाणी संपर्क व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महिला, तरुणींना होणारा त्रास थांबणार आहे. महिला साह्यता कक्षामध्ये वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

महिला मदत कक्षा'ची वैशिष्ट्ये 
* तरुणी, महिलांबाबतची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळली जाणार 
* कक्षाच्या समितीवर वकील, मानसशास्त्रज्ञ व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी 
* समुपदेशन, निवारा, पुनर्वसन व प्रशिक्षणावर भर देणार 

पुण्यासह काही ठिकाणी आधीच प्रयोग 
पुणे, मुंबईसह राज्यांतील काही शहरांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष सध्या कार्यरत आहेत. या कक्षाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांमध्ये महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. आता याच धर्तीवर देशपातळीवर प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला साह्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women help cell will be in every police station