कौटुंबिक वादातून दिरानेच केला भावजयीचा खून; आरोपी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

दिराने आपल्या भावजयीचा चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी येथे उघडकीस आला आहे.

कौटुंबिक वादातून दिरानेच केला भावजयीचा खून; आरोपी अटक

पुणे - दिराने आपल्या भावजयीचा चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजता वडगावशेरी येथे घडली.

लक्ष्मीबाई श्रीराम वय (वय 54,रा. बिडीकामगार वसाहत चंदननगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीनिवास श्रीराम असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे. याप्रकरणी सागर रमेश दासा (वय 39, मारुतीनगर वडगांवशेरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास व लक्ष्मीबाई हे दोघे दिर-भावजयी आहेत. तर फिर्यादी सागर हे देखील श्रीनिवास याचे मित्र आहेत. सागर यांच्याकडे देवीची परडी भरण्याचा क्रार्यक्रम करायचा होता. श्रीनिवास याने त्याची भावजयी लक्ष्मीबाई या परडी भरण्याचा कार्यक्रम करतात असे सागर यास सांगितले होते. त्यामुळे सागर यांनी शुक्रवारी दुपारी लक्ष्मीबाई यांना हि आपल्या घरी परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी बोलाविले होते. गेल्या काही वर्षापासून लक्ष्मीबाई व श्रीनिवास यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद आहेत. श्रीनिवास याची आई लक्ष्मीबाई यांच्या कुटूंबियासोबत राहत होती. त्याचा राग श्रीनिवास याच्या डोक्यात होता.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी लक्ष्मीबाई या सागर यांच्या घरी आल्या. हे श्रीनिवास याने पाहिले होते. त्यांनतर तो सागर यांच्या घरी आला. त्याने सागर यांच्या पत्नीला काहीतरी वस्तू घेऊन येण्यासाठी बाहेर पाठवले होते, तर सागर हे देखील बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत श्रीनिवास याने त्यांच्याकडील चाकूने लक्ष्मीबाई यांच्यावर वार केले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सागर व त्यांची पत्नी जेव्हा घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत तत्काळ चंदननगर पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

खून केल्यानंतर आरोपी फिरत असल्याची माहिती

लक्ष्मीबाई यांचा खून केल्यानंतर श्रीनिवास तेथून पसार झाला. तो शहरात विविध ठिकाणी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी श्रीनिवास यास तत्काळ अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत श्रीनिवास याने गुन्हा केल्याची कबुली दिली.