‘त्या’ महिला पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा - आमदार गौतम चाबुकस्वार

Gautam-Chabukswar
Gautam-Chabukswar

पिंपरी - कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. माझ्या मुलाने फटाके फोडले असतील, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मात्र, मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला. मारहाण करणाऱ्या ‘त्या’ महिला पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी केली आहे.

२१ ऑक्‍टोबर रोजी माझ्या मुलाचा वाढदिवस असल्याने तो आणि त्याचे भाऊ-बहीण नाशिक फाटा येथील पुलावर माझ्या गाडीतून फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्या वेळी माझ्या गाडीवर राजशिष्टाचाराचा स्टीकरही लावला होता. माझ्या मुलाने फटाके उडविले असतील, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, त्यास मारहाण करण्यात आली. त्याने आपण आमदाराचा मुलगा असल्याचे सांगितल्यानंतरही दमदाटी करून धक्‍काबुक्‍की करण्यात आली. याबाबत आपण पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या महिला पोलिस अधिकाऱ्याची बदली करावी, यासाठी पुन्हा पोलिस आयुक्‍तांना भेटणार असल्याचे आ. चाबुकस्वार यांनी सांगितले.

आमदारांच्या तक्रारीमुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस उपनिरीक्षक महिलेला आपली एक वेतनवाढ का रोखू नये, अशी नोटीस बजावली. त्या नोटिशीला उत्तर देताना महिला पोलिस उपनिरीक्षकाने त्यादिवशीची घटना लेखी उत्तरात लिहिली. आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र-मैत्रिणींना बरोबर घेऊन पुलावर वाढदिवस साजरा करीत होते. काही जण फटाके फोडण्याच्या तयारीत होते. रात्री एकच्या सुमारास भर रस्त्यात जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे हटकले. त्या वेळी मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाही, असे आवाज चढवून सांगितले. मात्र, आपण याठिकाणी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करता येणार नाही, असे त्या मुलांना सांगितले. त्यांच्या पालकांशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस ठाण्यात भेटा असा निरोपही दिला. मात्र, या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे तक्रार केली. 

त्या महिला अधिकाऱ्याच्या खुलाशानंतर कारवाई मागे घेत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या मुलांवर कारवाई करा, असे आदेश शुक्‍ला यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com