‘कुटुंबातील आर्थिक बाबींमध्ये महिलांना सामावून घ्यायला हवे’

विभा पडळकर यांचे प्रतिपादन; ‘सकाळ मनी’ दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
pune
punesakal

पुणे : ‘‘विमा कोणता घ्यायचा, यापेक्षा जास्त वेळ आपण मोबाईल कोणता खरेदी करायचा, यावर खर्च करतो. आयुष्याबाबतच्या मूलभूत आर्थिक बाबींची चर्चा जोपर्यंत डायनिंग टेबलावर होणार नाही, तोपर्यंत विम्यासारख्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिले जाणार नाही. कुटुंबातील महिलांना देखील त्यात समावून घेतले पाहिजे,’’ असे मत एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर यांनी आज व्यक्त केले.

‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सकाळ मनी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन पडळकर यांच्या हस्ते सोमवारी (ता. २५) येथे करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, संपादक सम्राट फडणीस, सहयोगी संपादक मुकुंद लेले; तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ-लेखक यावेळी उपस्थित होते. ‘सकाळ मनी’ दिवाळी अंकाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. उद्यापासून हा अंक बाजारात उपलब्ध होत आहे.

पडळकर म्हणाल्या, ‘‘बदललेल्या जीवनशैलीमुळे येणारे आजार सध्या वाढत आहेत. कोरोना काळात तर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवल्या. अडचणी व त्याच्या परिणामांची तुलना केली असता, आरोग्यविषयक होणारे परिणाम दुपटीने जास्त असतात. घरातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाले तर त्याचा किमान पुढील दोन पिढींवर परिमाण होत असतो. त्यामुळे आरोग्य विमा व आयुर्विमा कमी वयातच घेणे आवश्‍यक ठरते.’’

‘‘आपल्या मुलांच्या जवळ राहायचं; पण त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही, अशी पालकांची भावना असते. तसेच निवृत्तीनंतर स्वतःची आवड, हौस देखील पूर्ण करायची इच्छा असते. मात्र, त्यासाठी पुरेसे पैसे लागतात. त्यामुळे कमावत्या वयातच पेन्शन योजनेची निवड करून तरतूद करायला हवी,’’ असेही मत त्यांनी व्यक्त केले.

pune
बाबा रामदेव अडचणीत! अॅलोपॅथी विरोधातील वक्तव्य भोवणार

‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, ‘‘या अंकात अर्थ-उद्योग-गुंतवणुकीबरोबरच क्रिप्टोकरन्सी, स्टार्टअप अशा विविध विषयांवरील माहिती मराठी भाषेतून दिली गेलेली आहे. त्यामुळे हा केवळ दिवाळी अंक नसून, माहितीसंग्रह आहे. एरवी अगदी सहजासहजी न समजून येणाऱ्या आर्थिक बाबी अगदी सोप्या भाषेत अंकात मांडण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची अर्थविषयक सर्वांगीण माहिती सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.’’

‘सकाळ’ राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती फडणीस यांनी यावेळी दिली. लेले यांनी प्रास्ताविकात या अंकामागची भूमिका विषद केली. या दिवाळी अंकासाठी योगदान दिलेल्यांचा पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com