भय 'ती'चं संपत नाही; छळाला कंटाळून चाळीसवर विवाहितांची आत्महत्या 

women suicide for persecution by family member
women suicide for persecution by family member

पुणे :  शिकल्या-सवरलेल्या पूजाला मंगळ-गुरू असल्याचे सांगत सासरच्यांनी शांतीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले. तिचा जादूटोणाद्वारे मानसिक व शारीरिक छळ केला. तर, दुसरीकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी होणाऱ्या छळास कंटाळून गीताने गळफास घेत मृत्यूला जवळ केले... अशा मनाला चटका लावण्याबरोबरच चीड आणणाऱ्या घटना घडतायेत पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात. दोन वर्षांत शहरात हुंड्यापासून कौटुंबिक हिंसाचार ते अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांच्या छळास कंटाळून 40 हून अधिक विवाहितांनी स्वतःचा जीव संपविल्याचे वास्तव आहे. 

पुण्यात 2017 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून 20, तर 2018 मध्ये 19 महिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एका महिलेचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले, असा पोलिसांनाही डांगोरा पिटता येणार नाही. पोलिसांनी सगळ्या घटनांचा तत्काळ तपास करून आरोपींना अटक केली, हाच तो काही दिलासा. मात्र, महिलांच्या आत्महत्या होण्याची कारणे शोधून, या आत्महत्या कशा थांबतील, हुंडा मागणाऱ्या, त्यासाठी विवाहितांचा छळ करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा केला जाईल, यादृष्टीने पोलिसांबरोबरच समाजानेही विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

आत्महत्या केलेल्या महिलांची संख्या 
2017 - 20 
2018 - 19 
2019 - 02 

महिलांच्या छळाची कारणे 
* लग्नात व्यवस्थित मानपान न मिळणे 
* लग्नात ठरलेली हुंड्याची रक्कम, वस्तू मिळविण्यासाठी चारित्र्यावर संशय घेण्याची वृत्ती 
* घरातील विविध कामे व स्वयंपाक करता न येणे 
* फ्लॅट, व्यवसाय, गाडीसाठी माहेरहून पैसे आणावेत ही अपेक्षा 

पोलिसांकडूनही दुर्लक्ष 

महिला छळाबाबत पोलिस ठाण्यात दाद मागण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा संबंधित महिलांच्या प्रश्‍नाकडे पोलिस गांभीर्याने पाहत नाहीत. चौकशी, तपासाचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून "कौटुंबिक वाद' या गोंडस शब्दाखाली पोलिस संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सासरच्या लोकांचे मनोबल वाढून विवाहितांच्या छळामध्ये आणखीनच भर पडते. अनेकदा विवाहित महिला छळाविषयी कुटुंबीयांशी किंवा पोलिसांकडे न बोलता थेट आत्महत्येचा पर्याय निवडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

विवाहितांना सासरच्या लोकांकडून त्रास दिला जाण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्यादृष्टीने महिला सहाय्यता कक्षाच्या पोलिस अधिकारी-कर्मचारी व समुपदेशकांच्या मदतीने सासरच्या लोकांना समजावून सांगितले जाते. त्यांनी न ऐकल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाते. पोलिस ठाण्याच्या पातळीवर आम्ही पीडित महिला व कुटुंबांच्या दर शनिवारी बैठका घेऊन हा प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देतो. 
- विष्णू पवार, पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे. 

केवळ कष्टकरी वर्गातच नाही, तर उच्च शिक्षित कुटुंबीयांमध्येही विवाहितांचा वेगवेगळ्या कारणांमुळे शारीरिक व मानसिक छळ केला जातो. त्यास पैसा, चारित्र्य, मानपान, आजार अशी वेगवेगळी कारणे आहेत. निरक्षर किंवा अल्प शिक्षित महिलांना त्यांच्या हक्कांबाबत पुरेशी माहिती नसते. परंतु, शिकलेल्या महिला त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवितात. विवाहितांचे छळ व आत्महत्या थांबविण्यासाठी पोलिस व समाजानेही सजगता दाखविली पाहिजे. 
- ऍड. सुप्रिया कोठारी, संचालक, भगिनी हेल्पलाइन 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com