Vidhan Sabha 2019 : आधी मतदान, मग तुळशीबाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुण्यातल्या महिला मतदारांनी आधी मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला; अन्‌ त्यानंतरच तुळशीबागेत येऊन खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला.

विधानसभा 2019 
पुणे -  दिवाळीची गडबड, खरेदीची धांदल, मतदानाचे कर्तव्य या साऱ्यांत पुण्यातल्या महिला मतदारांनी आधी मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला; अन्‌ त्यानंतरच तुळशीबागेत येऊन खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला. खरेदीपेक्षा आम्ही मतदान केलंय, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान होतं. पुण्यासोबतच ग्रामीण भागातल्या महिलांनीही मतदानाला प्राधान्य दिल्याचं त्यांच्या बोलण्यात जाणवलं. 

दिवाळी काही दिवसांवर आल्याने घरोघरी फराळाचे पदार्थ आणि खरेदीकडे महिलांचा ओढा आहे. परिणामी सणासुदीमुळे महिला मतदानासाठी येतील का, याबाबत साशंकता होती. त्यातच गेले दोन दिवस जोरदार पाऊस असल्याने महिला खरेदीसाठी आल्या नव्हत्या. मतदानाच्या दिवशी पाऊस नसल्याने त्या खरेदीला प्राधान्य देण्याची शक्‍यता होती. त्या वेळी तुळशीबागेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, बहुतांशी महिलांनी सकाळीच मतदान केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, सकाळच्या सत्रात फारशी गर्दी नव्हती, ती दुपारनंतर अचानक वाढल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदार आघाडीवर असतील, असा त्यांचा अंदाज आहे. 

पिंपरीतील सुरेखा रणदिवे म्हणाल्या, ‘‘घरात दिवाळीनिमित्त तयारी सुरू आहे. खाद्यपदार्थ बनविण्यापासून अनेक कामे आहेत. पण मी आणि माझ्या मुलीने आधी मतदान केले. त्यानंतर आम्ही दोघीजणी खरेदीसाठी आलो आहोत. मतदानाचा हक्क बजाविल्याचा आंनद आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women voters in Pune enjoy shopping in Tulshibaug after voting