महिला दिन 2019 : ‘ती’ची असंख्य रूपं

महिला दिन 2019  : ‘ती’ची असंख्य रूपं

महिला दिन 2019 
‘ती’ची असंख्य रूपं. ‘ती’ मार्दव, कर्तृत्व, औदार्य, प्रज्ञा दाखविणारी. कधी मदतीला सहजपणे धावून जाणारी...निरंतर नव्याचा शोध घेऊन अभिनय संपन्न करणारी...संवादातून समाजमनाचा अचूक वेध घेणारी...गायन, योग, व्यवस्थापनशास्त्र आदींचा समन्वय साधत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी...या आणि अशा वैविध्यपूर्ण भूमिका बजावणाऱ्या समाजातील कर्तृत्ववान ‘ती’चा जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकाळ’ने घेतलेला वेध....

कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी 
गुंड, दरोडेखोर, रोडरोमिओंपासून अगदी कायद्याविरुद्ध वागणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या ‘दबंग’ अधिकारी म्हणून पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांची ओळख. आता दहशतवाद्यांना धडा शिकविण्याची इच्छाशक्ती बोलून दाखविणाऱ्या सिंह यांची राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (एनआयए) पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी सिंह यांच्यासारख्या ‘दबंग’ अधिकाऱ्याची ‘एनआयए’मध्ये प्रतिनियुक्ती होणे महत्त्वाचे ठरणार आहे. दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी आणि देशाची सुरक्षितता अबाधित ठेवण्याची जबाबदारी ‘एनआयए’वर आहे. या संस्थेत दोन ते तीन महिला अधिकारी सध्या कार्यरत आहे. 

जालना, नगर, कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना सिंह यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली. पुणे पोलिस दलात विशेष शाखेच्या परदेशी नागरिक नोंदणी (एफआरओ) विभागात त्यांनी सुसूत्रता आणली. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला, डीएसके आर्थिक घोटाळा व बीटकॉइन घोटाळ्यासारख्या तपासाला गती दिली. 

सिंह म्हणाल्या, ‘‘भारतामध्ये अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदून काढण्याचे काम करण्याची माझी इच्छा होती. त्यादृष्टीने आता  कामाची संधी मिळाली आहे. माझ्यासाठी हे मोठे आव्हान आहे.’’ 
- पांडुरंग सरोदे

*********************************************
स्वयंविकासातून समाजविकास...
उच्चशिक्षत आहेत, काही तरी करावेसे वाटते; पण संसारात अडकल्याने केवळ गृहिणी बनून राहिलेल्या महिला अस्वस्थ असतात. त्यांना संघटित करून त्यांच्यातील ऊर्मिला बळ देऊन समाजकार्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम गेल्या दोन दशकांपासून ‘संवादिनी’ या गटातून डॉ. अनघा लवळेकर करत आहेत. ‘स्वयंविकासातून समाजविकास’ हे ब्रीदवाक्‍य मनात रुजल्याने अनेक महिला संसार सांभाळून समाजासाठी योगदान देत आहेत.  

मानसशास्त्र हा डॉ. अनघा लवळेकर यांचा संशोधनाचा विषय. प्रज्ञा मानस विकास संस्थेच्या त्या प्रमुख असून गेल्या २२ वर्षांपासून त्यांनी विपुल संशोधन केले आहे. ‘घरामध्ये सगळे अनुकूल असूनही आपण आनंदी नाही, कंटाळा आला आहे’, असा अनेक महिलांच्या तक्रारीचा सूर असतो. मानसशास्त्रात संशोधन करताना या महिलांना एकत्र करून २००० मध्ये ‘संवादिनी’ गट पुण्यात स्थापन केला. आता या गटाचा विस्तार पुण्यासह शिरूर, बोरिवली, डोंबिवली, सोलापूर इथपर्यंत झाला आहे. सुरवातीच्या काळात महिन्यातून एकदा भेटून व्याख्यान, चर्चासत्र यातून विचारमंथन केले जात होते. महिलांमध्ये नवीन कौशल्य आत्मसात करण्याची इच्छा जागी झाल्याने त्यातून स्वतःचा शोध घेता आल्याने त्या समाधानी झाल्या. या कार्यात नवीन स्वयंसेविका जोडल्या जात असल्यातरी पूर्वीपासून काम करणाऱ्या महिला आत्ताही आनंदाने कार्यरत आहेत.

 समाजात पौगांड अवस्थेतील मुलांचे प्रश्‍न समोर येऊ लागला. प्रज्ञा मानस विभागाची मदत घेऊन शास्त्रीय अभ्यास व संशोधन करून संवादिनींनी मुलांशी संवाद सुरू केला. तसेच तरुणांसाठी ‘सहजीवनाच्या उंबरठ्यावर’ हा उपक्रम सुरू केला. ‘संवादिनी’ची द्विदशकपूर्ती होत असताना वंचित घटकातील मुले, ग्रामीण भागातील महिला, किशोरवयीन मुले-मुलींसाठी विविध उपक्रम महिलांकडून सुरू आहे. 
- ब्रिजमोहन पाटील
*********************************************

अपघातग्रस्तांना  जीवनदान देणारी ‘पूजा’
अपघाताच्या वेळी योग्य मदत मिळाल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो. त्यांना मरणाच्या दारातून परत आणण्याचे कामही समाधानाचे असते. हेच काम गेल्या दहा वर्षांपासून पूजा साठीलकर ही युवती करीत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील व्यक्तींना तातडीने रुग्णालयात पोचविण्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा उभारण्याचे काम ती आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने करते. 

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी सामाजिक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेकडे ३ रुग्णवाहिका असून, त्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कुठलाही अपघात झाल्यास तत्काळ घटनास्थळी दाखल होतात. महामार्गावर ९४ किलोमीटरच्या परिसरात अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोचवण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. या कामासाठी पूजाला तिचा भाऊ शुभम साठीलकर, बहीण भक्ती, वडील गुरुनाथ आणि आईची मदत होत आहे. कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्‍त त्यांचा ५० जणांचा ग्रुप आहे. त्यात महिलांचा सहभाग मोठा आहे. संस्थेच्या वतीने एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, त्यात २५६ सभासद आहेत. द्रुतगती मार्गावर कार्यरत असलेले पोलिस, परिसरातील सामाजिक संस्था, स्थानिक नेते व कार्यकर्ते आदींचा त्यात समावेश आहे. या ग्रुपवर अपघातीचा माहिती मिळताच संस्थेच्या व्यक्ती रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना मदत करतात. या संस्थेने आतापर्यंत सुमारे २०० अपघातग्रस्तांना मदत केली आहे. त्यातील ६० टक्के अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते.  सिव्हिल इंजिनिअर असलेल्या पूजाने दीड वर्ष एका कंपनीत नोकरी केली. मात्र त्यात तिचे मन रमले नाही. त्यामुळे तिने पुढे इंटेरियर डेकोरेटरचा व्यवसाय सुरू केला आणि आपले सामाजिक कामही सुरू ठेवले आहे.   
- सनील गाडेकर

*********************************************

क्षमतांचा निरंतर शोध घेणारी अभिनेत्री
‘हजार चौरासी की माँ,’ ‘श्वास,’ ‘ध्यासपर्व’ यांसारख्या चित्रपटांमधून आगळीवेगळी मुद्रा उमटवणाऱ्या अश्विनी गिरी या महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू होत्या, याची आज रसिकांना कल्पनाही नसेल. आत्मभान व समाजभानामुळे आलेली अभिव्यक्तीतील समज नव्या पिढीकडे प्रशिक्षणातून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. 

नवीन संधी आली, की  ‘करून तर पाहू ’ या मनोधारणेतून मजल-दरमजल स्वत:च्या क्षमतांचा निरंतर घेतलेला शोध आणि विस्तारलेलं क्षितिज हे अश्विनी गिरी या अभिनेत्रीचं सार्थ वर्णन ठरू शकेल. 

अश्विनी सांगतात, ‘‘कामातून काम मिळत गेलं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत असताना सहविद्यार्थी चित्तरंजन गिरींबरोबर सूर जुळले. नंतर आम्ही लग्न करून दोघांनीही यातच कार्यरत राहायचा निर्णय घेतला. मुंबईत राहून काही काळ काम केलं. मग पुण्यात. इथंही उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर मनाजोगतं काम करता येतं आहे म्हणून इथंच आम्ही स्थिरावलो. शिकवायची संधीही इथल्या वास्तव्यामुळेच आली.

 विद्यार्थ्यांना शिकवताना लक्षात आलं, की प्रत्येकाचे संदर्भ वेगळे आहेत. मी शिकले ती तंत्रं यांच्यासाठी उपयुक्त ठरतीलच असं नाही. यातून नवं शोधत गेले. विद्यार्थ्यांना शरीर, श्वास, आवाजाचा वापर याचं जास्तीत जास्त भान देण्यासाठी काही थिएटर गेम्स शोधले. बरंच काम करीत राहिले. त्यातून अभिनेत्री म्हणून माझ्यातली सहजता प्रचंड वाढली. 

शरीराची तंदुरुस्ती जेवढी जास्त, तेवढंच मन लवचिक होऊ शकतं. यासाठी मी शिकलेलं मार्शल आर्ट वापरून प्रारूप तयार केलं. जगण्याविषयीचं भान प्रत्येकात असणं ते विकसित होत राहाणं फार गरजेचं आहे. त्यासाठी नाट्य-चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून कलावंत बरंच काही करू शकतात. यासाठी नवी पिढी सज्ज व्हावी, यासाठी हे प्रयत्न आहेत.’’
-नीला शर्मा 

*********************************************

ध्रुपदगायन अन्‌ विज्ञानाचा साधना संगम 
आश्‍लेषा शिंत्रे ही तरुणी ध्रुपदगायन व योगाभ्यासाचा मेळ घालून आपले व इतरांचेही जगणे अधिकाधिक सजग होण्यासाठी प्रयत्नशील आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगचा अमेरिकेतून घेतलेली पदवी, एका कंपनीसाठी तयार केलेले सॉफ्टवेअर, यांतून पक्का झालेला तिचा तार्किक विचारसरणीचा पायाही तेवढाच महत्त्वाचा आहे.

आश्‍लेषा कधी एखाद्या बैठकीत ध्रुपदगायन करताना दिसेल, तर कधी ‘बैठक’ या गटामार्फत वाड्यावस्त्यांमधील एखाद्या शाळेत मुलांना तानपुरा हाताळायला देऊन त्याची माहिती देताना दिसेल. कधी ती योगविद्येचे शिक्षण देता देता संबंधितांना स्वत:च्या मनाच्या व शरीराच्या हालचालींकडे लक्ष केंद्रित करायला लावताना दिसेल. कधी ध्रुपदगायनातील आलापी व योगाभ्यासातील प्राणायाम क्रियेतील साम्य यांच्याबद्दल काही सांगताना दिसेल. एकाच व्यक्तीची किती ही रूपे?  आश्‍लेषा म्हणते, ‘‘भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत कोणत्याही अभ्यासविषयाकडे पाहताना त्यात निरनिराळ्या विषयांचा मिलाफ असतो. संगीत,  इतिहास, गणित, भाषा आदींचा परस्परसंबंध मानला जातो. माझ्यासाठी प्रत्येक विषयाच्या अभ्यास दुसऱ्यासाठी पूरक ठरला. भारतीय अभिजात संगीतातील ख्यालगायन  शिकत होते. नंतर गुरुजी उदय भवाळकर यांचे ध्रुपदगायन ऐकताना त्यांची स्थिरता, तानपुऱ्याची ताकद व आलापीचा प्रभाव पडला. मग त्यांच्याकडे ध्रुपद शिकू लागले. योगसाधना करताना विशिष्ट प्रकारच्या मंत्रजपातील स्वर एकाग्रता वाढवतात. मनाबरोबरच देहात कोठे, काय चालले आहे; याकडे सजगतेने पाहत पुन्हा परत यायला श्वासावरील अवधान महत्त्वाचे ठरते.’’ 
- नीला शर्मा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com