पिंपरी पालिकेत महिलाराज; चार समित्या महिलांकडे

उत्तम कुटे
मंगळवार, 11 एप्रिल 2017

सत्तेत येताच नव्या रुढी व प्रथा सुरु करणाऱ्या भाजपने ही प्रथा कायम ठेवली आहे. गतवेळी महापौर महिला (शकुंतला धराडे) तर उपमहापौर प्रभाकर वाघेरे होते. यावेळी महापौर पुरुष (नितीन काळजे) तर उपमहापौर महिला (शैलजा मोरे) आहेत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाचपैकी तीन विषय समित्यांचे सभापतीपद महिलांकडे गेल्याने पालिकेतील महिलाराज या पंचवार्षिकलाही कायम राहिले आहे. 

नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप प्रथमच पालिकेत सत्तेत आला असून यापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या राजवटीत महिला नगरसेवकांना दिलेले मानाचे पान त्यांनीही कायम ठेवले आहे. 

स्थानिक स्वराज संस्थांत महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या महिन्यात झालेल्या 64 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. 2014 मध्ये ही संख्या 65 होती. त्यावेळी शिवसेनेच्या सुलभा उबाळे या खुल्या गटातून निवडून आल्या होत्या. क्रीडा समिती वगळता इतर समिती सभापतीपदे ही मागील टर्ममध्ये महिलांकडे होती. 

सत्तेत येताच नव्या रुढी व प्रथा सुरु करणाऱ्या भाजपने ही प्रथा कायम ठेवली आहे. गतवेळी महापौर महिला (शकुंतला धराडे) तर उपमहापौर प्रभाकर वाघेरे होते. यावेळी महापौर पुरुष (नितीन काळजे) तर उपमहापौर महिला (शैलजा मोरे) आहेत. पाचपैकी सर्वांत महत्त्वाची आणि पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचे पहिल्या वर्षाचे अध्यक्ष या महिला (सीमा सावळे) आहेत. तर पालिका आणि या समित्यांतील भाजपचे बहुमत बाकीच्या चारही समित्यांचे सभापती भाजपचे आणि ते सुद्धा बिनविरोध झाल्यात जमा आहे. फक्त येत्या 15 तारखेला त्याबाबत औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. चारपैकी विधी (शारदा सोनवणे) आणि महिला बालकल्याण (सुनीता तापकीर) समित्यांचे सभापतीपद महिलांकडे गेले आहे. 

क्रीडा समिती सभापतीपदी पुरुष नगरसेवकाला (लक्ष्मण सस्ते) विराजमान झाले आहेत.तर या टर्मला शहर सुधारणा समिती पुरुष नगरसेवकाकडे (सागर गवळी) गेली आहे. जैवविविधता व वृक्ष समितीसह सहा प्रभाग अध्यक्षांची निवड येत्या मासिक सभेत होण्याची शक्यता आहे. तेथेही बहुतांश महिलांची निवड झाली तर आरक्षणापेक्षाही जास्त संधी पदाधिकारी म्हणून मिळणार आहे. भाजपचे बहूमत असलेल्या पालिकेत महिला पदाधिकाऱ्यांचेही बहूमत होऊन उद्योगनगरीत खऱ्या अर्थाने महिलाराज अवतरणार आहे.

Web Title: womens dominate in pimpri chinchwad municipal corporation