प्रचारासाठी महिलाही सरसावल्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

महिला उमेदवारांच्या प्रचारात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रामुख्याने दिसतेच; पण पुरुष उमेदवारांच्या प्रचारातही त्यांच्या बरोबरीने महिला उतरल्या आहेत. उमेदवारांच्या नातेवाइकांसह बचत गट, स्वयंसेवी संस्था, नोकरदार, कामगार संघटना, सोसायटी आणि पक्षांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सहभाग दिसेल. 

पुणे - महिलांसाठी तब्बल पन्नास टक्के म्हणजे निम्म्या जागांची तरतूद झाल्यानंतरची महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात उमेदवारांप्रमाणेच कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. रंगीबेरंगी साड्या नेसून हाती पक्षाचा झेंडा घेऊन घोषणा देणाऱ्या, प्रचार पत्रकांच्या वाटपापासून ते भेटीगाठीपर्यंतच्या कामात भाग घेणाऱ्या महिला कार्यकर्त्या उमेदवारांना साथ देत आहेत. 

महिला उमेदवारांच्या प्रचारात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रामुख्याने दिसतेच; पण पुरुष उमेदवारांच्या प्रचारातही त्यांच्या बरोबरीने महिला उतरल्या आहेत. उमेदवारांच्या नातेवाइकांसह बचत गट, स्वयंसेवी संस्था, नोकरदार, कामगार संघटना, सोसायटी आणि पक्षांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सहभाग दिसेल. 

महिला उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. रॅलीत घोषणा देत "आमच्या लाडक्‍या उमेदवाराला मत द्या,' असे आवाहन करणाऱ्या महिला प्रभागात जाऊन काम करत आहेत. उमेदवारांसह मतदारांच्या भेटीगाठी, प्रचार पत्रकांचे वाटप, सोसायट्यांमध्ये जाऊन महिला मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणे आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे काम या महिला कार्यकर्त्या करत आहेत. यानिमित्ताने काही महिलांना रोजगारही मिळाला आहे. प्रचारात सहभागी होणाऱ्या महिलांमध्ये महिला उमेदवारांच्या बचत गटातील, कामगार संघटनांमधील आणि नोकरदार महिलांची संख्या अधिक आहे. या निवडणुकीत पुरुष उमेदवारांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रचाराची धुरा महिला उमेदवारांनी महिला कार्यकर्त्यांवर सोपविलेली दिसेल. पुरुष उमेदवारांच्या प्रचारातही महिला कार्यकर्त्या दिसून येतील. 

सकाळी प्रचार रॅलीत, दुपारी भेटीगाठी आणि सायंकाळी पुन्हा रॅली असा महिला कार्यकर्त्यांचा दिनक्रम बनला आहे. 25 वयोगटातील युवतींसह 70 वर्षांच्या पुढील ज्येष्ठ महिलाही प्रचारात सहभागी झालेल्या दिसतील. 

सोशल मीडियावरही जोरदार प्रचार 
प्रचाराशिवाय महिला उमेदवारांचा सोशल मीडियावरील प्रचाराची धुराही काही महिला कार्यकर्त्या सांभाळत आहेत. उमेदवारांचे फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरील अपडेट हाताळण्याचे काम त्या करत आहेत. याबरोबरच रोजच्या प्रचाराची क्षणचित्रेही वेगळ्या धाटणीत मांडणाऱ्या कंटेंट रायटर महिलांचीही कमतरता नाही. निवडणुकीतील महिला उमेदवाराच्या मैत्रिणी आणि सहकारीही त्यांचा प्रचार करताना दिसतील. अगदी डॉक्‍टरपासून ते कलाकार महिलेपर्यंत सगळ्यांचा प्रचारात सहभाग दिसेल.

Web Title: womens lead in campaigning