विमानतळाच्या नव्या पार्किंग लॉटचे काम वेगात

Airport-Work
Airport-Work

पुणे - लोहगाव विमानतळावरील पार्किंगची क्षमता वाढविण्यासाठी सुरू केलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे काम वेगाने सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे पार्किंगची क्षमता चौपट होणार असून त्यात पाच वर्षांनंतर विस्तारीकरणासाठीही वाव असेल. 

लोहगाव विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर दोन वाहनतळ आहेत. त्याच्या शेजारी नव्या बहुमजली पार्किंग इमारतीचे काम सुरू आहे. सध्याच्या पार्किंग लॉटमध्ये सुमारे २५० मोटारी उभ्या राहू शकतात. परंतु, नव्या इमारतीत सुमारे एक हजार मोटारी उभ्या करता येतील. सुमारे ९ हजार चौरस मीटर भूखंडावर पार्किंग इमारतीचे काम सुरू झाले आहे. तळमजला आणि त्यावर तीन मजले असतील. तसेच तळमजल्याखालीही दोन मजले असतील. त्यामुळे प्रवाशांना सहा मजल्यांवर त्यांच्या मोटारी उभ्या करता येतील. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकल्पासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्च येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) मंजुरीनुसार लोहगाव विमानतळ प्रशासनाच्या माध्यमातून पार्किंग लॉटचे काम सुरू आहे. या बहुमजली इमारतीतील काही मजल्यांवर मॅकेनाईजड्‌ पार्किंगचीही सुविधा असेल. ज्या प्रमाणात पार्किंगची गरज वाढेल, त्यानुसार मॅकेनाईजड्‌ पार्किंगची क्षमता वाढविणार असल्याचे लोहगाव विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे दोन वर्षांत म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये पार्किंगची ही इमारत विमानतळ प्रशासनाच्या ताब्यात येईल. विमानतळावर सध्या रात्री विमानांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्या वेळी पार्किंग लॉटसमध्ये वर्दळ असते. तसेच एक किंवा दोन दिवसांसाठी पार्किंगमध्ये मोटारी उभ्या करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. त्यांच्याकडून सध्या २४ तासांसाठी ३०० रुपये शुल्क आकारले जाते. 

प्रवाशांना मिळणार टोकन
पार्किंगच्या नव्या इमारतीमध्ये मोटार आतमध्ये प्रवेश करताना प्रवाशाला टोकन मिळेल. तो किती वेळ मोटार उभी करेल, त्यानुसार त्याच्याकडून शुल्क आकारले जाणार आहे. त्याचे दर भारतीय विमानतळ प्राधिकरण निश्‍चित करणार आहे. २०२७ पर्यंत वाढणारी प्रवासी क्षमता लक्षात घेऊन या पार्किंग लॉटची रचना केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१४ शहरांसाठी विमानसेवा सुरू
कोरोनापूर्वी लोहगाव विमानतळावर दररोज सुमारे १८० विमानांची वाहतूक होत असे. त्यातून सुमारे २५ प्रवाशांची ये-जा होत असे. सध्या कमाल ७६ विमानांची ये-जा होते. त्यातून सुमारे ९ हजार प्रवाशांची विमानतळावर वर्दळ असते. दिल्ली, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, जयपूर, कोलकता, प्रयागराज आदी १४ शहरांसाठी सध्या विमान वाहतूक सुरू आहे.

कोरोनानंतरच्या कालखंडात विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची संख्याही वाढती आहे. त्यासाठी सध्या पुरेसे पार्किंग उपलब्ध आहे. परंतु, भविष्याचा विचार करून पार्किंगच्या नव्या इमारतीसाठी बांधकाम हाती घेतले आहे. 
- कुलदीपसिंग, संचालक, विमानतळ 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com