मोदी-शहांनी सांगितले तरी समिती सोडणार नसल्याचा अनिल घनवटांचा निर्धार

Anil-Ghanwat
Anil-Ghanwat

पुणे - देशातील शेतकऱ्यांना बंदिस्त बाजारपेठांच्या साखळदंडांनी बांधलेले आहे. ते तोडण्यासाठी शरद जोशी यांनी आयुष्यभर काम केले. शेतकरी कायद्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची आता कुठेतरी संधी मिळाली आहे. त्यामुळे मोदी-शहांनी सांगितले तरी मी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून बाहेर पडणार नाही, असा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी व्यक्त केला. मोदी सरकारने आणलेल्या कृषी पणन कायदे स्थगित करून सर्वोच्च न्यायालयाने समाधानकारक तोडगा सुचविण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे. यात अनिल घनवट यांचा आहे. 

घनवट म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा कोणाकडेही मी समितीची किंवा मला समितीत नेमण्याची मागणी केली नव्हती. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या समस्या, आशा-अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी न्यायालयाने स्वतःहून ही समिती नेमली व त्यात मला काम करण्याची संधी दिली. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच हे शक्य झाले. त्यांचे काही मुद्दे चुकीचे व काही बरोबरही असतील. पण या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न मांडण्याची संधी चालून आल्याचे मी मानतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मान यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की मान यांनी देखील शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. ते शरद जोशी यांच्याच विचाराने सतत काम करीत राहिले. मात्र ते पंजाबचे असल्याने त्यांना या समितीत काम करताना गैरसोय वाटली असावी. समितीत राहण्यापेक्षा तेथील शेतकऱ्यांसोबत राहणे त्यांनी पसंत केले आहे. तथापि, मी समिती सोडणार नाही. अगदी मोदी-शहांनी सांगितले तरी मी हटणार नाही. सर्वोच्च न्यायालय काम थांबविण्याचे सांगत नाही तोपर्यंत आम्ही काम करीत राहू.

‘आम्ही देशातील सर्व शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी देखील मला भाऊ समजून बोलावे. मी देखील शेतकरी आहे. मी त्यांच्याशी बोलेन. एकत्र बसून न्यायालयाला सर्व समस्या उलगडून सांगण्याची ही संधी शेतकऱ्यांना आली आहे. शरद जोशींनी आयुष्य वेचले पण त्यांना हा दिवस बघता आला नाही.’ असे ते म्हणाले.

‘कायदे रद्द करण्याच्या बाजूचा मी नाही. आम्हाला सुधारणा हव्या आहेत. या कायद्यांमध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांचे प्रतिबिंब हवे आहे. आमची समिती त्यासाठीच काम करेल,' असेही घनवट यांनी स्पष्ट केले. 

माझ्या यशात मोठा वाटा ‘अॅग्रोवन’चा
शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा आणि कथा मी गेल्या काही वर्षांपासून ‘अॅग्रोवन’मध्ये मांडतो आहे. माझ्या भूमिकेला ‘अॅग्रोवन’ने सतत राज्यासमोर नेले. कोणत्याही पक्षाची बाजू न घेता शेतकऱ्यांच्या हितार्थ मी भांडत असल्याचे कुठून तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळेच मला समितीत काम करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या यशात मोठा वाटा ‘अॅग्रोवन’चा असल्याचे मी मानतो,’’ असे घनवट यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com