कागदपत्रे कुरिअर करण्याचे प्रमाण घटले; वस्तू पाठविण्याचे आकडे होताय पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

दिवाळी निमित्ताने पाठविण्यात येणा-या विविध वस्तू आणि घरगुती व्यवसायांचे पार्सल वाढल्याने कुरिअर व्यावसायिकांची गाडी रुळावर येत आहे.

पुणे : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील ऑनलाइन कामकाज वाढल्याने गेल्या काही दिवसांत कागदपत्रे कुरिअरने पाठविण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. मात्र दिवाळी निमित्ताने पाठविण्यात येणा-या विविध वस्तू आणि घरगुती व्यवसायांचे पार्सल वाढल्याने कुरिअर व्यावसायिकांची गाडी रुळावर येत आहे.

हे ही वाचा : भुयारी मेट्रोसाठी रेंजहिल्स ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंतच्या दोन्ही बोगद्यांचे काम मंगळवारी पूर्ण

ऍडमिशन, कायदेशीर बाबी, कंपन्यांमधील व्यवहार यासह विविध कारणांसाठी वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात कागदपत्रे कुरिअर मार्फत पाठविण्यात येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कागदपत्रांवर आधारित असलेल्या ब-याचशा प्रक्रिया थांबल्या आहेत. तर अनेक आवश्‍यक कामे आता ऑनलाइन करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कागदपत्रे जमा करण्यापेक्षा ती ऑनलाइन अपलोड करण्यावर भर आहे. त्यामुळे कुरिअर कंपन्यांद्वारे कागदपत्रे पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे कुरिअर व्यावसायिक दीपाली देवळेकर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सध्या अनेक घरगुती व्यवसाय सुरू झाले आहेत. जवळच्या ऑर्डर ते स्वतः नेऊन देत आहेत. मात्र 10 किलोमीटर पेक्षा लांब असलेली कमी किंमतीची ऑर्डर त्यांना स्वतः घेऊन जाणे परवडत नाहीत. त्यामुळे ते कुरिअर कंपनीचा आधार घेत आहेत. दररोजच्या पार्सलचा विचार केला असता त्यात सुमारे 20 टक्के वस्तू या घरगुती व्यावसायिकांच्या आहेत, असे व्यावसायिक सांगतात.

हे ही वाचा : देशाचे पहिले बीआयएस सौरउष्ण चाचणी केंद्र पुण्यात

कुरिअर व्यावसायिक अजय सुपेकर म्हणाले, परदेशात पाठविण्यासाठी सध्या दररोज 50 ते 70 पार्सल येत आहेत. दिवाळीनिमित्त पाठविण्यात येणा-या पार्सलची संख्या वाढत आहे. मात्र गेल्या वर्षीचा विचार केला असता व्यवसायाची उलाढाल 70 टक्‍क्‍यांपर्यंत आली आहे. कोरोनाचा जोर ओसरेल तशी उलाढाल वाढेल, असा विश्‍वास आहे. वस्तू पाठविण्यासाठी येणारे नागरिक कोरोनाविषयक खबरदारी घेत असल्याचे दिसते.

या वस्तूंचे होतेय पार्सल

दिवाळी फराळ, कपडे, गिफ्ट, सजावटीच्या वस्तू, रांगोळी, घरगुती व्यावसायिकांची विविध उत्पादने

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of courier traders has started due to the increase in the number of parcels of various items and household items being sent on the occasion of Diwali