चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम पुढील आठवड्यापासून : बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणे : भूमिपूजन होऊनही दीड वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या कामास अखेर मुहूर्त लागणार आहे. पुढील आठवड्यात पुलाचे काम सुरू करण्याचा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हैदराबाद येथील कंपनीला दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. 

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाच्या कामाचे उद्‌घाटन झाले होते. प्रत्यक्षात मात्र जागा ताब्यात नसल्यामुळे हे काम दीड वर्ष रखडले होते. अखेर पुलासाठी आवश्‍यक जागेचे संपादन झाल्यामुळे कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी ही माहिती दिली. 

नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल व तेथील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल, असा विश्‍वास व्यक्त करून बापट म्हणाले, "हैदराबाद येथील एनसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. तशी "वर्क ऑर्डर' राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंपनीला दिली आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर आठवडाभरात हे काम सुरू होईल. त्यासाठी लागणारे भूसंपादन महापालिकेने करायचे आहे.

शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय केंद्रीय महामार्ग खाते काम सुरू करण्यास तयार नव्हते. पालकमंत्री या नात्याने गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. यातून पुणेकरांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात पक्षाला यश आले आहे.'' 

895 कोटी 
उड्डाण पुलासाठी अपेक्षित खर्च 

397 कोटी 
पहिल्या टप्प्यातील खर्च 

85 टक्के 
झालेले भूसंपादन 

15 टक्के 
रखडलेले भूसंपादन 

Web Title: The work of the flyovers in Chandni Chowk from next week says Girish Bapat