एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांना करता येणार प्री-वेडींग फोटोशुट

अनिल सावळे
Tuesday, 1 December 2020

पर्यटकांसाठी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुटचीही सुविधा 

पुणे : आयटीसह काही बड्या कंपन्यांतील बहुतांश कर्मचारी आता वर्क फ्रॉम होमला कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत निसर्गरम्य डोंगररांगाच्या सानिध्यात थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासस्थानातून कंपनीचे कामकाज करता आले तर...महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी वर्क फ्रॉम नेचरची संकल्पना आणली आहे. या ठिकाणी कार्पोरेट कंपन्यांना त्यांच्या बैठकाही घेता येतील. यासोबतच इतर हौशी पर्यटकांना डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट करता येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग-व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमवर भर दिला. बहुतांश आयटीसह काही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी घरीच बसून कामकाज करीत आहेत. मात्र, तेच कार्यालयीन कामकाज निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्यास कार्यालयीन कामकाजासोबत निसर्गाचाही सुखद अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाऊनपासून परिसर, खोल्या, उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना किमान पुढील दोन वर्षे करण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्‍सीमिटर अशी खास व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच, त्यांना मास्क, फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर देण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबत खबरदारीचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती एमटीडीसीकडून देण्यात आली. 

पर्यटकांसाठी कोयना लेक खुले होणार... 
कोयना अभयारण्य आणि धरण क्षेत्राच्या परिसरातील कोयनानगर येथील पर्यटक निवास कोयना लेक या आठवडयात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. कोयना लेकमधून धरणाचे नयनरम्य दृश्‍य आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे. याठिकाणी 22 कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स असून, रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

लोणावळा कार्ला, महाबळेश्‍वर, माळशेज घाट, पानशेत, माथेरान आणि भीमाशंकरसोबत कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थानांमध्ये वर्क फ्रॉम नेचरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वच्छ, रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या परिसरातील पर्यटक निवासस्थानांमध्ये खाद्यपदार्थाचीही मेजवानी असेल. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे. 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work from Nature now at MTDC's resort