मेट्रोसाठी भुयार पाडण्याची शक्‍यता 

bhuyari marg
bhuyari marg

पुणे : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना स्वारगेटला सापडलेल्या भुयारी मार्गाची आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. हा भुयारी मार्ग पेशवेकालीन किंवा ऐतिहासिक असल्याचा कोणताही दाखला त्यांनी दिलेला नाही, असे समजते. हा बोगदा म्हणजे महापालिकेच्या पाण्याच्या व्यवस्थेचा एक भाग असून, आता त्याची उपयुक्तता राहिलेली नाही, असेही मत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामादरम्यान हे भुयार पाडले जाऊ शकेल, अशी चिन्हे आहेत. 

स्वारगेट चौकाजवळ कृषी महाविद्यालय ते स्वारगेट यादरम्यान मेट्रोसाठी भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. मेट्रोच्या कामादरम्यान 57 मीटर लांबीचे दोन भुयारी मार्ग सापडले आहेत. मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबमध्ये या भुयाराचा अडथळा होत असल्याचे महामेट्रोने महापालिकेला लेखी कळविले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भुयारी मार्गाची पाहणी केली आहे. 

मुठा उजवा कालव्यातून पाणी उचलून शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी हा भुयारी मार्ग 1945 ते 50 च्या दरम्यान तत्कालीन पुणे नगरपालिकेने उभारला आहे. पानशेत पुरानंतर पुण्याची लोकसंख्या वाढली. त्यामुळे 1968 मध्ये स्वारगेटला जलकेंद्र बांधण्यात आले. मुठा उजवा कालव्यातून पाणी उचलून या केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी या भुयाराचा वापर सुरू होता. त्यानंतर काही काळ या भुयाराद्वारे पूर्वी येथे असलेल्या जलतरण तलावासाठी पाणी पोचविले जात होते. आता जलकेंद्र आणि जलतरण तलाव याठिकाणी राहिलेले नाही. या बोगद्याची सध्या कोणतीही उपयुक्तता राहिलेली नाही, असे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

या भुयारात लोखंडी जलवाहिनी आढळली आहे. त्यामुळे या भुयाराला कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही. पाणी वाहून नेणारी ही जुनी व्यवस्था आहे, असे प्राथमिक मत आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, महापालिका आणि आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी याबाबतचे लेखी पत्र महामेट्रोला येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये देणार आहेत. दरम्यानच्या काळात मेट्रोचे काम सुरू राहणार आहे, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com