कामगार विविध योजनांपासून वंचित

सनील गाडेकर
शनिवार, 20 जुलै 2019

मुले झाले तरीही लग्नाचे पैसे नाही
नोंदणी झालेल्या बांधकाम मजुराला त्याच्या लग्नासाठी ३० हजार रुपये देण्याची योजना आहे. मात्र, अर्ज केलेल्या कामगाराचे लग्न होऊन त्याला मुलं झाली तरीही अद्याप या योजनेचे पैसे अनेकांना मिळाले नाहीत. असे १० अर्ज प्रलंबित आहेत. तसेच पहिल्या बाळंतपणाला केलेला अर्ज दुसऱ्या बाळंतपणापर्यंत मंजूर झाला नसल्याचे प्रकार घडले आहेत.याबाबतचे ५६ प्रकरणे अद्याप मंजूर झालेले नसल्याचे वसंत पवार यांनी सांगितले.

पुणे - कागदपत्रांची पूर्तता केली नाही, योजना तुम्हाला लागू होत नाही, यासह अनेक कारणे देत निधी असूनही बांधकाम मजुरांना सरकारच्या विविध योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने अनेक अर्ज कामगार आयुक्तालयात पडून आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे असलेल्या निधीचा कामगारांना अपेक्षेप्रमाणे फायदा होत नाही. मंडळाकडे सध्या ७ हजार ४८२  कोटी ३३ लाख रुपये जमा असून, आतापर्यंत ८३० कोटी ५१ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यातील ७२२ कोटी ६ लाख रुपये विविध योजनांचा लाभ देण्यासाठी, तर १०८ कोटी ४५ लाख रुपये प्रशासकीय कामांसाठी खर्च झाले आहेत.

उपकर आणि कामगारांची नोंदणी फी व वार्षिक वर्गणीच्या माध्यमातून ही रक्कम जमा झाली आहे. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदत, गंभीर आजार, लग्न, बाळंतपण, स्कॉलरशिप, अवजारांसाठी अनुदान अशा विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी संघटनेने केलेले २ हजार ८०९ अर्ज २०१४ पासून प्रलंबित आहेत. मंडळाच्या अकार्यक्षम कारभारामुळे कामगारांना त्यांच्या हक्‍काचे पैसे मिळत नसल्याची खंत बांधकाम कामगार संघटनेचे सचिव वसंत पवार यांनी व्यक्त केली.

कामगार आयुक्तालयाकडे विविध मंडळांचे काम देण्यात आले आहे. ही सर्व कामे बघून प्रशासनाला कामगारांचे विविध योजनांचे अर्ज मंजूर करावे लागतात. मध्यंतरी काही बोगस कामगारांची नोंदणी झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे खरे लाभार्थी शोधून त्यांना योजनांचा लाभ देण्यात काहीसा उशीर होत आहे. 
- एस. सी. श्रीरंगम, सचिव, कल्याणकारी मंडळ

कामगारांनी विविध योजनेसाठी अर्ज केल्यास कधीच वेळेत पैसे मिळत नाहीत. जुना अर्ज मिळत नाही म्हणून पुनर्नोंदणी झाली नाही किंवा अर्जदाराला योजनांचा लाभ देण्यास नाकारले जात आहेत. 
- अजित अभ्यंकर, अध्यक्ष, बांधकाम कामगार संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker Deprived of various schemes