पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुळशीकर सरसावले

गोरख माझिरे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुळशी तालुक्यातील अनेक संस्था, संघटना व नागरिक सरसावले आहेत. कार्यकर्ते घरोघरी जाऊन पूरग्रस्तांसाठी विविध साहित्य गोळा करत आहेत. तसेच, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक थेट मदतकार्यात सहभागी झाले आहे. 
 

कोळवण (पुणे) : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुळशी तालुक्यातील अनेक संस्था, संघटना व नागरिक सरसावले आहेत. कार्यकर्ते घरोघरी जाऊन पूरग्रस्तांसाठी विविध साहित्य गोळा करत आहेत. तसेच, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक थेट मदतकार्यात सहभागी झाले आहे. 

सोनेरी मुळशी मित्र परिवार या "व्हॉट्‌सऍप ग्रुप'च्या माध्यमातून तालुक्‍यातील राजकीय, सामाजिक, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती दीड लाख रुपये पूरग्रस्तांना देणार आहेत. शिवराय फाउंडेशनच्या वतीने 20 सदस्य तालुक्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून कपडे, पाणी बाटल्या, धान्य, तेल, औषधे, रोख रक्कम जमा करत आहे. स्वराज्य प्रतिष्ठान, शिवकार्य प्रतिष्ठान, मावळा प्रतिष्ठान, शिव प्रतिष्ठान, शिवशक्ती सामाजिक मंडळ या सर्व संस्थांचे कार्यकर्ते मुळशी धरण विभागातील निवे ते मुळशी या भागात पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यासाठी फिरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीमार्फत तालुक्‍यातील सुमारे 100 स्वयंसेवक घरोघरी जाऊन धान्य, औषधे, वस्त्र व रोख रक्कम जमा करणार आहेत. 

कासारअंबोलीचे माजी सरपंच राजेंद्र भिवराव मारणे व श्रीमंत कासार पाटील मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने ब्लॅंकेट, ताडपत्री, कोरडा शिधा, बिस्कीट पुडे, औषधे, प्रथमोपचार पेटी, टॉवेल, टॉर्च, मेणबत्ती, मच्छरदाणी, मच्छर अगरबत्ती, टूथपेस्ट, साबण, कपडे आदी प्रकारचे साहित्य गोळा केले जात आहे. खिलार बैल प्रेमी व खिल्लार महाराष्ट्राची शान मित्र परिवाराच्या वतीने सर्व सदस्य प्रत्येकी 1000 रुपये जमा करत आहेत. 

पिरंगुटच्या अखिल गणेशनगर नवरात्र उत्सव समितीच्या वतीने सुमारे चार हजार चपात्या व चटण्या गोळा करून पूरग्रस्त भागात पाठविण्यात आल्या. शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या वतीने पिरंगुट, भुकूम, लवळे, सुतारवाडी गावांत घरोघरी जाऊन वस्तुरूपात साहित्य गोळा केले जात आहे. समस्त ग्रामस्थ पिरंगुटकरांच्या वतीने सुमारे 500 किलो धान्य गोळा केले आहे. 

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती पथक आपल्याकडील आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य घेऊन जयसिंगपूर, कुरुंदवाड येथे मदत कार्यात सहभागी झाले आहे. 

कोल्हापूरकरांच्या मदतीची आठवण 
कोल्हापूर येथील शिवाजी पुलावर 26 जानेवारी 2018 रोजी मिनीबसचा अपघात होऊन 13 मुळशीकरांना प्राणाला मुकावे लागले होते. त्या वेळी कोल्हापूरकरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बसमधील तीन जणांचा प्राण वाचला होता. त्याची आठवण करून देऊन मुळशीकरांना मदतीचे आवाहन केले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers in Mulshi taluka move around to help the flood victims