प्रेम प्रकरणातून कामगाराचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कोरेगाव भीमा - प्रेमप्रकरणातून सणसवाडी (ता. शिरूर) येथे सुपरवायझरने कंत्राटी कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेत संतोष शहाजी राठोड (रा. येडशी, ता. जि. उस्मानाबाद) याने केलेल्या चाकू हल्ल्यात कंत्राटी कामगार दामोदर कृष्णा जबल (वय ४०, रा. धारावी, मुंबई) याचा मृत्यू झाला आहे. 

लेबर काँन्ट्रॅक्‍टर अमित अभिमन्यू जाधव (वय ३५, रा. गुलमोहर सिटी, पाम्स बिल्डिंग, खराडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी संतोष राठोड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सणसवाडीतील लेबर काँन्ट्रॅक्‍टर अमित जाधव यांच्याकडे राठोड सुपरवायझर तर जबल हा कामगार म्हणून एका कंपनीत कामाला होते. दरम्यान, कारखान्यातील एका मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणावरून त्यांच्यात १८ ऑगस्टला मारामारी झाली होती. मात्र, जाधव यांनी त्याला समज देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला होता. 

पूर्वीचा राग मनात धरून राठोड याने आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जबल याला सणसवाडीत एका कंपनीच्या गेटसमोर गाठून त्याच्या पोटात धारदार चाकूने वार करून पळून गेला. या वेळी स्थानिकांनी पोलिसांना कळविले. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वाघोलीत खासगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

घटनास्थळी दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोरे यांनी पाहणी केली. पोलिसांकडून दोन तपास पथकाद्वारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक एस. जी. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. यू. वैरागकर तपास करीत आहेत.

Web Title: Workers murder of love affair koregaon bhima