कामगारांना जुन्या नोटांद्वारेच पगार

कामगारांना जुन्या नोटांद्वारेच पगार

काळा पैसा खपविण्यासाठी कंपन्यांकडून वाटप; औद्योगिक सुटीचा दिवसही रांगेतच
पिंपरी - जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर अनेक कंपन्यांनी काळा पैसा खपविण्यासाठी कामगारांना जुन्या नोटाद्वारे पगार दिला. मात्र, महिनाभरानंतर पुन्हा कामगारांना जुन्याच नोटांद्वारे पगार केला. यामुळे औद्योगिक सुटीचा दिवस जुन्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी रांगेतच घालवावा लागला. यामुळे नोटाबंदीच्या महिनाभरानंतरही शहरातील बॅंकांबाहेर रांगेचे चित्र कायम असल्याचे दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यास एक महिना उलटून गेल्यानंतरही बॅंकेसमोरच्या रांगा कमी होताना दिसत नाही. पिंपरी-चिंचवड शहर ही कामगारनगरी म्हणून ओळखली जाते. गुरुवार हा येथील औद्योगिक सुटीचा वार आहे. यामुळे जुन्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी तसेच घरखर्चासाठी बॅंकेतून रक्‍कम काढण्यासाठी गुरुवारीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली. यामुळे पैसे काढण्यासाठी जवळपास चार तास रांगेत उभे राहावे लागत होते. बॅंकेतून पैसे काढण्यासाठी सरकारने जरी निर्बंध हटविले असले, तरी बॅंकेत सुट्ट्या पैशाची कमतरता असल्याने ठराविकच रक्‍कम दिली जात होती.

कामगारांना पुन्हा जुन्याच नोटा
शहरातील कामगारांना गेल्या महिन्यात चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटांद्वारे पगार केले होते. हे पैसे ठराविक ठिकाणी स्वीकारत असल्याने फारशी अडचण जाणवत नव्हती. आता सरकारने पेट्रोलपंप व औषधांची दुकाने येथेही नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आहे. त्यातच पुन्हा मालकांकडून जुन्या नोटांद्वारे पगार करण्यात आल्याने जुन्या नोटा खात्यात भरण्यासाठी सुटीचा दिवस बॅंकेच्या रांगेत घालवावा लागला.

एटीएममध्येही खडखडाट
शहरातील बहुतांश एटीएममध्ये गुरुवारीही पैसे नसल्याचा बोर्ड दिसत होता. सरकारने मोठमोठी दुकाने व मॉल येथे डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे पैसे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मॉलमध्ये पैसे देण्यासाठी वेगळे काउंटर उघडण्यात आले होते. मात्र, तिथेही 80 ते 100 जण रांगेत उभे असल्याचे दिसून आले.

शाळेची फी भरायची कशी?
अनेका शाळांकडून दोन टप्प्यांत मुलांची फी भरण्याची सवलत दिली जाते. पहिल्या सहामाहीनंतर शाळेकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात आहे. काही शाळा धनादेश स्वीकारत नाहीत आणि कार्ड किंवा ऑनलाइन फी भरण्याची सुविधाही नाही. शाळेकडून चलन देण्यात येते. हे चलन आणि पैसे बॅंकेत भरायचे असते. मात्र, बॅंकेत पैसे भरण्यासाठी तीन ते चार तासांचा वेळ जात असल्याने नागरिकांना सुटी घेऊन रांगेत उभे राहावे लागते. याशिवाय अनेक पालकांकडे चलनातील पैसेच नसल्याने फी भरायची तरी कशी, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

दैनंदिन उलाढालीतही घट
नागरिकांकडे खरेदीसाठी पैसे नसल्याने ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरविली आहे. याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. असेच चित्र आणखी काही दिवस राहिल्यास कामगारांचे पगार करणेही मुश्‍कील होईल, अशी भावना व्यापारी व्यक्‍त करीत आहे.

'गरिबांचे फार हाल सुरू आहेत. या महिन्यात व मागील महिन्यात कंपनीने जुन्याच नोटांद्वारे पगार दिला. आता पुन्हा ते बॅंकेत भरण्यासाठी आलो असता बॅंकवाले विचारणा करताहेत की या नोटा कुठे लपून ठेवल्या होत्या. खर्चाला एका बाजूला पैसा नाही, तर दुसरीकडे चलनातील नोटा मिळविण्यासाठी कामाचा खाडा करावा लागत आहे.''
- उषा गायकवाड, कामगार

'सरकारचा निर्णय चांगलाच असल्याने आम्ही सुरवातीला स्वागत केले होते. पण आता महिन्यानंतरही गर्दी कमी होत नाही. एटीएम बंद आहेत आणि बॅंकेत खूप वेळ रांगेत उभे राहिल्यावर केवळ तीनच हजार रुपये हातात टेकविले जातात. किमान दहा हजार रुपये तरी बॅंकेतून मिळायला पाहिजेत. दररोज रांगेत उभे राहण्यासाठी वेळ नाही.''
- बाळकृष्ण कलापुरे, लघुउद्योजक

'गैरसोय होत आहे; पण पुढे काही चांगले होणार असल्याने ती सहन करण्याची तयारी आहे. आपल्या घरात जरी काही बदल करायचा असेल तरी गैरसोय होते. पण आपण थोडीफार त्रास सहन करतो. थोड्याच दिवसांत हा त्रासही कमी होईल, अशी आशा आहे.''
- मोहन सलगर, पर्यवेक्षक

'नोटबंदीचा निर्णय योग्यच आहे; पण बॅंकेचे व्यवस्थापन ढिसाळ आहे. लोकांना रांगेत उभे राहावे लागू नये किंवा कमी त्रास व्हावा, यासाठी बॅंकांनी आपली कार्यक्षमता वाढवायला पाहिजे. खासगी बॅंकांमध्ये 24 हजारांची मर्यादा असून ग्राहकांनाही तेवढे पैसे मिळतात. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकेत फक्‍त तीनच हजार रुपये दिले जातात. यामुळे ग्राहकांना वारंवार रांगेत उभे राहावे लागते. यामुळेच बॅंकेत गर्दी होते.''
- अप्पाराव तांबारे, लिपिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com