घुसमट तर होतेय; पण सांगणार कोणाला? 

घुसमट तर होतेय; पण सांगणार कोणाला? 

पुणे - ‘‘दुष्काळानं आपली माणसं, गाव सोडायची वेळ आली. गावकडं मोकळ-चाकळं होतं. आता पुण्यात ८ बाय १०च्या खोलीत कुटुंबासह राहावं लागतंय. इथला रोजचा खर्च करून शिलकीतून गावाकडं म्हताऱ्या मायबापासाठी पैसा पाठवावा लागतोय. पुण्यात राहायचं म्हणजे सोप नाही. ‘इकड आड; तिकड विहीर’ अशी अवस्था झालीय बघा. हे कोणाला सांगून काय फरक पडणार नाय. आपण आपलं काम करून दिवस काढायचा. नाहीतर अवघड हाय...’’ दुष्काळाच्या चटक्‍यात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या कष्टकऱ्यांचे हे बोल. 

विमल आणि अशोक पवार हे दांपत्य नांदेड जिल्ह्यातील मुखेडचं. गेल्या वर्षी ते रोजगाराच्या शोधात पुण्यात आलं. वारज्यातील झोपडपट्टीत पत्र्याच्या शेडची खोली भाड्यानं घेऊन त्यांनी संसार थाटला आहे.

मजूर अड्ड्यावर कामाच्या शोधात असलेल्या विमल पवार म्हणाल्या, ‘‘गावाकडं दिवसभर काम करून १००-१५० रुपये मजुरी मिळत नव्हती. उन्हाळ्यात पाणी नसल्यानं शेतातली कामं बंद होत्यात; म्हणून गेल्या साली पुण्यात आलो. इथं कधी काम मिळतंय तर कधी नाही. सगळं चांगलं होईल वाटल होतं; पण इथबी सोपं नाय.’’

अशोक पवार यांना पोराच्या शिक्षणाचं कसं होणार, हा प्रश्‍न सतावतोय, ‘‘पोरं शाळेत जातात. शिक्षणाला लई खर्च हाय. पण, त्यांना शिकवावं तर लागलंच. इथला खर्च भागवून गावाकडं मायबाला पैसा द्यावा लागतो. मला कधी ५०० तर कधी ६०० रुपये मजुरी मिळते. महिन्यातून १८-२० दिवस काम मिळालं तर कसंतरी घर चालतं. गावाकडे दुष्काळ, पाणी असतं, तर जरा बरा पैसा मिळाला असता. इथं  आलो नसतो,’’ अशा शब्दांत त्यांनी त्यांची खदखद व्यक्त केली.
 

गावी जायचं नाव बी नाय 
नांदेडच्या हदगावचे उत्तम खानजोडे म्हणाले, ‘‘मी बिगारी काम करतो, बायको सोसायटीतला कचरा गोळा करती. दोघांचं मिळून महिन्याला १२-१३ हजार मिळत्यात. त्यातलं २-३ हजार गावाकडं द्यावं लागतात. गावाकडं जायचं म्हणल्यावर मोठा खर्च हाय. आता उन्हाळ्यात तिकडं जायचं नाव बी घेत नाय.’’

(समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com