महापालिकेतील जनतेची कामे रखडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

 महापालिकेच्या सर्व खात्यांचे काम ऑनलाइन झाल्याचे सांगून महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दंड थोपटले. मात्र, अजूनही मृत्यू दाखल्यापासून मिळकत कर, बांधकामातील बदल, त्याची परवानगी, अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी नागरिकांना खेटे घालावे लागत आहेत.

पुणे - महापालिकेच्या सर्व खात्यांचे काम ऑनलाइन झाल्याचे सांगून महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दंड थोपटले. मात्र, अजूनही मृत्यू दाखल्यापासून मिळकत कर, बांधकामातील बदल, त्याची परवानगी, अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी नागरिकांना खेटे घालावे लागत आहेत. महापालिकेतील बहुतांश खात्यांतील अधिकारी आणि जबाबदार कर्मचारी हे निवडणुकीच्या नावाखाली कार्यालयात फिरकत नसल्याचे स्पष्ट आहे.

अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्याचे कारण सांगत आहेत. पण, ते खरोखरीच त्या कामात आहेत का? याची साधी पाहणीही होत नसल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठांना न सांगताच दांडी मारली जाते. मुख्य खात्यांसह क्षेत्रीय कार्यालयातही ही परिस्थिती आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून एकही क्षेत्रीय अधिकारी वेळेत लोकांना उपलब्ध होत नाही, अशी तक्रार आहे.

मुख्य खात्यांसह क्षेत्रीय कार्यालयांत वेगवेगळ्या कामांसाठी येणाऱ्या लोकांची संख्या साधारणत: ७ हजार आहे. त्यात मृत्यू दाखल्यासह, शहरी-गरीब योजनांसह अन्य कामांसाठी लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याशिवाय, आर्थिक वर्ष संपणार असल्याने पंधरा दिवसांपासून मिळकत कर, पाणीपट्टी भरण्यासाठी लोकांची वर्दळ होती. मात्र, बिलाबाबत आक्षेप घेत अधिकऱ्यांकडे धाव घेतली तेव्हा अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे त्यांना चकरा मारव्या लागत आहेत. 

शहरी गरीब योजनेचा अर्ज घेण्यासाठी तीन दिवस आरोग्य खात्यात येत आहे. पण, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. आधी जी कागदपत्रे मागितली; त्याची पूर्तता करूनही काम झालेले नाही.
- नामदेव पवार, नागरिक

Web Title: The works of the people of the municipal corporation have been stopped