दहावीचं टेन्शन गुल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल पालक, शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम आज मावळला. ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या दहावी अभ्यासमाला कार्यशाळेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व गर्दी करीत शिक्षणतज्ज्ञांकडून दहावीतील यशाचा मंत्र आत्मसात केला. या कार्यशाळेतून पालकांच्या मनात अभ्यासक्रमाविषयी असलेल्या शंकादेखील दूर झाल्या. पाल्याकडून अभ्यास कसा करून घ्यावा, याचे तंत्रही त्यांना मिळाले.

पुणे - दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल पालक, शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम आज मावळला. ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या दहावी अभ्यासमाला कार्यशाळेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व गर्दी करीत शिक्षणतज्ज्ञांकडून दहावीतील यशाचा मंत्र आत्मसात केला. या कार्यशाळेतून पालकांच्या मनात अभ्यासक्रमाविषयी असलेल्या शंकादेखील दूर झाल्या. पाल्याकडून अभ्यास कसा करून घ्यावा, याचे तंत्रही त्यांना मिळाले.

डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती 
विद्यार्थ्यांसह पालकांनाही दहावीची भीती बाळगण्याचे कारण नाही. आवश्‍यकतेनुसार काळानुरूप नवीन अभ्यासक्रम तयार केला.
ज्ञानावर आधारित प्रश्‍न यापूर्वी परीक्षेला विचारले जात होते. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करता यावी, अशी नव्या अभ्यासक्रमाची रचना. 
आता विद्यार्थ्यांना विषय किती समजला, त्याचे आकलन कितपत झाले, यावर आधारित प्रश्‍न असतील. कृतिपत्रिकेत (पेपर) अभ्यासक्रमाबाहेरीलही प्रश्‍न.
दहावीच्या अभ्यासाचा दबाव पालकांनी मुलांवर टाकू नये. 
शाळांकडून यापूर्वी २० गुण अंतर्गत असायचे. आता ती पद्धत बंद केली आहे.

डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ 
ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, परीक्षा पद्धती, शिक्षकांचे प्रशिक्षण हे या नव्या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य.  
दहावीच्या विद्यार्थ्यांना नववीची पाठ्यपुस्तके आणि अभ्यासाची उजळणी करावी लागेल. सहा विषयांमध्ये प्रत्येकी २० टक्के प्रश्‍न हे नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. 
गटचर्चेवर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. अभ्यासासाठी पालक त्यांना उत्तम सहकार्य करू शकतील. पाठ्यपुस्तकातील लिंक इंटरनेटद्वारे खुल्या करून त्यातील माहिती विद्यार्थ्यांना द्यावी.
अंतर्गत मूल्यमापनाचे गुण यंदा बंद केले आहेत. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन, इंटरनेटची मदत, कृतिशील आणि प्रयोगशील शिक्षणावर भर द्यावा. 

प्राजक्ती गोखले, गणितज्ञ
नव्या अभ्यासक्रमानुसार सहावीपासून गणित विषयाचे फायनान्शिअल मॅपिंग केले आहे. अर्थकारण म्हणजे काय, गुंतवणूक कशी करावी, हे विद्यार्थ्यांना समजेल. 
दहावीत ‘जीएसटी’ असला, तरी कोणत्या वस्तूवर किती कर लागू आहे, हे अपेक्षित नाही. केवळ जीएसटीची ओळख होऊन शेकडेवारीचे गणित अपेक्षित.
संख्याशास्त्राला विशेष महत्त्व असून, मुलांनी त्याचा अभ्यास गांभीर्याने करावा. 
पाठ्यपुस्तकांवर आधारित पेपर असले, तरीही विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीने ते सोडविता येतील. विद्यार्थ्यांनी स्वत: केलेल्या ‘कन्सेप्ट मॅपिंग’ला विशेष महत्त्व.

उपनगरांतही कार्यशाळा
दहावी अभ्यासक्रम कार्यशाळेला पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे ‘सकाळ’ अशा प्रकाराच्या कार्यशाळा प्रत्येक उपनगरी भागात आयोजित करणार आहे. त्याचा तपशील, नियोजित तारखा आणि वेळा या ‘सकाळ’मधून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ‘सकाळ दहावी अभ्यासमाला’ या सदरात नियोजित कार्यशाळांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना वाचायला मिळेल. 

Web Title: workshop on SSC Study Course by Sakal Media Group