दहावीचा अभ्यासक्रम कृतींवर आधारित 

दहावीचा अभ्यासक्रम कृतींवर आधारित 

पिंपरी - ‘‘विद्यार्थ्यांनी कष्ट, प्रयत्न आणि अभ्यास केल्यास दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळविणे शक्‍य आहे. ज्ञानरचनावाद हा नव्या अभ्यासक्रमाचा गाभा आहे. दहावीचा सुधारित अभ्यासक्रम हा कृतींवर आधारित आहे. निरीक्षण, वेळेचे नियोजन, पाठांतर, सराव आदी प्रमुख बाबींवर विद्यार्थ्यांनी भर दिल्यास त्यांना हा अभ्यास सोपा वाटेल,’’ असे मत तज्ज्ञ वक्‍त्यांनी गुरुवारी (ता. २०) नवी सांगवी येथे व्यक्त केले. 

‘सकाळ’ माध्यम समूह आणि सीझन ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांनी ‘सकाळ दहावी अभ्यासमाला’ या उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा घेतली. नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेला शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, डॉ. उमेश प्रधान, वसंत गवळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, वितरण विभागाचे सरव्यवस्थापक सुनील लोंढे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘दहावीचा सुधारित अभ्यासक्रम हा ज्ञानरचनावादावर आधारित आहे. विज्ञान १ व २, गणित १ व २ आणि इतिहास व भूगोल या विषयांचे २० टक्के प्रश्‍न नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. विद्यार्थ्यांची गटचर्चा झाल्यास त्यांना अभ्यासात चांगली मदत होऊ शकेल.’’ 

डॉ. प्रधान म्हणाले, ‘‘सुधारित अभ्यासक्रमात आता प्रश्‍नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका असणार आहे. कृतिपत्रिकेत वैविध्य असेल. त्यामुळे कौशल्य, विचार करण्याची क्षमता यांची कसोटी लागणार आहे. अभ्यास करताना पाठांतर, निरीक्षण, वेळेचे नियोजन, सराव, अभ्यासाची जागा यांचे सुयोग्य नियोजन आवश्‍यक आहे.’’

गवळे म्हणाले, ‘‘दहावीचे गणित सोपे झाले असले तरी गणितात पूर्ण गुण मिळविणे अवघड जाणार आहे. अभ्यासक्रमावर आधारित मात्र, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील काही प्रश्‍नांचा कृतिपत्रिकेत समावेश असेल. ‘सकाळ’मध्ये येणारी कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी अवश्‍य सोडवावी. गणितासाठी सराव हाच महत्त्वाचा आहे. 

चिलेकर यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमांची माहिती दिली. शिक्षण क्षेत्रात संशोधनाला वाव आहे, असे मत शितोळे यांनी व्यक्त केले. संतोष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’च्या वितरण विभागाचे व्यवस्थापक संतोष कुडले यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com