पहाटप्रहरी उडाले हास्याचे फवारे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पिंपरी - पहाटे सहाची वेळ. गार वारा सुटलेला. अशा प्रसन्न वातावरणात कासारवाडीतील पटांगणात हास्याचे फवारे उडू लागले. वयाची बंधने झुगारून देत सर्व वयोगटातील नागरिकांनी रावण हास्य, स्वागत हास्य, डेक्कन क्वीन असे हास्याचे प्रकार उत्साहाने केले. निमित्त होते जागतिक हास्यदिवसाचे.

पिंपरी - पहाटे सहाची वेळ. गार वारा सुटलेला. अशा प्रसन्न वातावरणात कासारवाडीतील पटांगणात हास्याचे फवारे उडू लागले. वयाची बंधने झुगारून देत सर्व वयोगटातील नागरिकांनी रावण हास्य, स्वागत हास्य, डेक्कन क्वीन असे हास्याचे प्रकार उत्साहाने केले. निमित्त होते जागतिक हास्यदिवसाचे.

या कार्यक्रमात नागरिकांनी मनमुराद हास्याचा आनंद लुटला. नवचैतन्य हास्य परिवाराच्या पिंपळे गुरव शाखेचे कार्याध्यक्ष ॲड. प्रताप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी हास्याचे विविध प्रकार केले. साबळे यांनी हास्य दिवसाचे महत्त्व विशद केले. १९०८ मध्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्ये हास्यदिन सुरू झाला. त्यानंतर तब्बल ९० वर्षांनी भारतात मदन कटारिया यांनी ‘लाफ्टर क्‍लब’ सुरू केला. गेल्या २० वर्षात देशभरात अनेक ठिकाणी हास्यक्‍लब सुरू झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘टाळ्या वाजविणे, मुलांसारखे वागणे, प्राणायाम आणि व्यायाम असे हास्ययोगाचे चार प्रमुख प्रकार आहेत. धनुष्यबाण, कापड मोजणे, कापणे, शिवणे, पडघम, मूक, ऑलिम्पिकमध्ये वजन उचलल्यासारखे करून हासणे, कांडप अशा विविध ११० प्रकारे हास्ययोग केला जातो. डेक्कन क्‍वीन हास्ययोगामध्ये डेक्कन क्वीनमध्ये उभे राहिल्यावर जसे हेलकावे बसतील तसे हेलकावे घेत हास्ययोग करण्यात येतो. ट्रॅक्‍टर चालविण्याच्या योगात प्रथम फक्त उजवा, नंतर डावा आणि नंतर दोन्ही हात पाठीमागून पुढे या पद्धतीने फिरविले जातात. आरसा हास्ययोगात एका हाताचा तळवा डोळ्यांसमोर धरून जणू आपण आरशात पाहत आहोत, असे गृहीत धरून हास्य केले जाते. कांडप प्रकारात आपण कांडप यंत्रावर काम करत असल्याची कृती केली जाते. त्याचप्रमाणे ह, हा, हू, अ, आ, ई, च, चा, ची या प्रकारचे हास्य केल्याने चेहऱ्याला व्यायाम होतो.’’ काशिनाथ कलशेट्टी, रघुनाथ साळुंखे, अंकुश भामे, गणेश आगरकर, संजय शेवडे संयोजन केले.

माफी मागतानाचे हास्य करताना कानाच्या पाळ्या पाच वेळा ओढल्या जातात. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. तसेच एखाद्याला चष्मा असल्यास त्याचा नंबरही कमी होण्यास मदत होते. 
-ॲड प्रताप साबळे, कार्याध्यक्ष, नवचैतन्य हास्य परिवार, पिंपळे गुरव

Web Title: World Laughter Day celebrated in pimpri