शहरातील स्वयंसेवक मदतीस सदैव तत्पर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

जागतिक रेडक्रॉस दिन हा जागतिक स्वयंसेवक दिवस म्हणून साजरा केला जातो. शहरामध्ये विविध क्षेत्रांत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत. त्यातील काही प्रमुख संघटनांच्या स्वयंसेवकांशी दीपेश सुराणा यांनी साधलेला हा संवाद.

गरीब रुग्णांना मोफत औषधे, जेवण
‘‘महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब व असहाय्य रुग्णांना मोफत औषधे, जेवण आणि उपचारादरम्यान गरजेनुसार रक्त उपलब्ध करून देण्याचे काम ‘रिअल लाइफ, रिअल पीपल’ संस्था करते. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध घेणे, ज्यांचे नातेवाईक नसतील त्यांचे उपचारानंतर पुनर्वसन करणे, एड्‌स, क्षयरोग पीडित रुग्णांना सुविधा देणे आदी कामे संस्थेमार्फत २०१० पासून केली जातात,’’ अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महंमद हुसेन यांनी दिली.

आपत्कालीन परिस्थितीत आवश्‍यक मदत
‘‘महापालिकेला आपत्कालीन व्यवस्थापनासाठी संस्कार प्रतिष्ठान सर्वतोपरी मदत करते. २००५-०६ मध्ये पवना नदीला पूर आला होता. त्या वेळी सुरू असलेल्या मदतकार्यात प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांना १५ ते २० दिवस हिरिरीने भाग घेतला होता. त्याशिवाय, माळीण गावातील दुर्घटनेनंतर तेथील ग्रामस्थांना १५ दिवस वैद्यकीय मदत केली. खाद्यपदार्थांचे वाटप केले. त्याशिवाय, गणेशोत्सव काळात निर्माल्य दान व गणपती मूर्तिदानाचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येतो. शहरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, आळंदी येथे आषाढी व कार्तिकी एकादशीला संस्थेचे स्वयंसेवक विशेष पोलिस अधिकारी म्हणून पोलिसांच्या मदतीला असतात,’’ असे सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड यांनी सांगितले.

अपघातग्रस्तांसाठी  ‘प्रथम मदतनीस’
‘‘अपघात झाल्यानंतर तातडीने रुग्णाला मदत मिळावी, या उद्देशाने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीतर्फे ‘प्रथम मदतनीस’ हा उपक्रम राबविण्यात येतो. शहरातील प्रमुख रहदारीच्या चौकात स्थानिक स्वयंसेवक कार्यरत असतात. रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना रिक्षा किंवा ॲम्ब्युलन्समधून जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते. याशिवाय काळेवाडी फाटा चौक, टिळक चौक (निगडी), भक्ती-शक्ती चौक (निगडी), संभाजी चौक (प्राधिकरण) अशा प्रमुख ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत करतात. उन्हाळ्यातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ‘जागते रहो...’ हा उपक्रम संस्था राबविते. निगडी, रुपीनगर, यमुनानगर आणि प्राधिकरणात संस्थेचे स्वयंसेवक रात्रीची गस्त घालत आहेत,’’ अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी दिली.

Web Title: World Red Cross Day