असे असेल वाघोलीचे कचरा नियोजन 

नीलेश कांकरिया  ------ 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुणे ः लातूरच्या धर्तीवर वाघोली ग्रामपंचायत कचरा नियोजन करणार आहे. यासाठी "एक वॉर्ड एक प्रकल्प' उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पाच सरकारी जागांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, तसेच जिल्हा परिषदेकडे सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागेल. 

वाघोलीत कचऱ्याची समस्या सध्या खूपच गंभीर बनली आहे. दोन कचरा प्रकल्प सुरू करण्यात आले होते. मात्र दोन्ही अपयशी ठरले आहेत. कचरा डंपिंग करण्यासाठी जागेचाही प्रश्न असल्याने त्याची गंभीरता वाढली. त्यामुळे "सर्वत्र कचराच कचरा' अशी सध्या स्थिती आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लातूर येथील कचरा प्रकल्प व नियोजनाची माहिती घेतली. त्यानंतर यावर कार्यवाही सुरू करण्यात आली. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्याला खीळ बसली. आता पुन्हा या कामाला गती येऊ लागली आहे. सदस्यांच्या मासिक बैठकीत या नियोजनाची सविस्तर चर्चा झाली. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायत ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यास सुरवात करणार आहे. 

प्रकल्पात समावेश होणारे घटक 

- कचरा गोळा करण्यासाठी 20 घंटा गाड्या. 
- प्रत्येक गाडीवर एक महिला सहायक (ओला व सुका कचरा वेगळा घेण्यासाठी) 
- 25 हजार मिळकतदारांना प्रत्येकी दोन डस्टबिनचे वाटप. 
- प्रकल्प चालविण्यासाठी एजन्सीची नेमणूक. 
- ओला व सुका कचरा वेगळा असेल तरच स्वीकारणार. 
- ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती. 

अपेक्षित खर्च 
--------------- 
- एका प्रकल्पासाठी ः अंदाजे 60 ते 70 लाख खर्च. 
- एकूण सहा प्रकल्पांसाठी ः अंदाजे चार कोटी खर्च 
- 50 हजार डस्टबीन खरेदी ः अंदाजे 40 लाख 

----- 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This would be Wagholi waste planning