"सहापदरी'मुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार 

katraj-kondha-road
katraj-kondha-road

पुणे - मोठी वाहतूक असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळला असला तरी, आतापर्यंत राज्य महामार्गाचा भाग असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि त्यानुसार तो तब्बल सहापदरी करण्याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या होत आहे. केवळ कात्रज-कोंढवा रस्ताच नव्हे, तर वडगाव धायरीपासून थेऊर फाट्यापर्यंतच्या 45 किलोमीटरचा बाह्यवळण मार्गही सहापदरी होणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. 

वडगाव, कात्रज, कोंढवा, मंतरवाडी चौक, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि लोणीकंदच्या काही भागांचा समावेश या राष्ट्रीय महामार्गात झाला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने राज्यातील 20 रस्त्यांचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला आहे. त्यात शहराच्या भोवतालचा कात्रज-कोंढवा रस्त्याचा समावेश आहे. कात्रज-कोंढवा रस्ता हा वर्दळीचा आहे. हैदराबाद, सोलापूर, नगर रस्त्याकडे तसेच मुंबई, बंगळूर, कोल्हापूरकडे जाणारी जड वाहने प्रामुख्याने या रस्त्याचा वापर करतात. हा रस्ता सहा लेनचा करण्याचे नियोजन गेल्या पंधरा वर्षांपासून कागदावरच आहे. सहा लेनच्या रस्त्यासाठी आखणी झाली आहे. त्यानंतरही त्यात अनेक बांधकामे झाली. या रस्त्याचा सुमारे साडेतीन किलोमीटरचा भाग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्या बांधकामांनाही अनुक्रमे जिल्हाधिकारी, महापालिकेने नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र, त्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तसूभरही पुढे सरकलेले नाही. त्यासाठी वेळोवेळी विविध राजकीय पक्षांनी त्यासाठी आंदोलने केली होती; परंतु ती व्यर्थ ठरली. या पार्श्‍वभूमीवर आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. 

या रस्त्याचा फायदा काय ? 
पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुण्यातून या विमानतळाकडे जायचे असल्यास सर्वांत जवळचा आणि तुलनेने कमी रहदारीचा मार्ग हा कात्रज-कोंढवा असेल. तसेच हा 45 किलोमीटरचा रस्ता नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता आणि पालखी मार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे हडपसर आणि शहरातंर्गत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. सध्या हा रस्ता अरुंद असून, त्यावर जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे वारंवार येथे अपघात होतात. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर सेवा रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. 

असा असेल रस्ता 
हा 45 किलोमीटरचा रस्ता सहा लेनचा असेल. त्यातील चार लेन मुख्य वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. उर्वरित दोन्ही बाजूच्या लेन या सुविधा रस्ता (सर्व्हिस रोड) असतील. या रस्त्यावरील सुमारे 3. 5 किलोमीटरच्या रस्त्याचा भाग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्याचे विकसन महापालिकेनेच करायचे आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा म्हणून पाठपुरावा केला होता. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी तीन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत या रस्त्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात झाला आहे. 

प्रकल्प अहवालाचे काम सुरू 
वडगाव ते थेऊर फाट्यापर्यंतच्या या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होणार आहे. त्यासाठीचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 16 डिसेंबर रोजी त्याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा प्रकल्प अहवाल सहा महिन्यांत तयार होईल. त्याला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिल्यावर त्याच्या निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरवात होऊ शकते. 

महापालिकेचा ठराव विखंडित? 
महापालिकेच्या हद्दीतील सुमारे 3. 5 किलोमीटरच्या रस्त्याचे विकसन करण्यासाठी 215 कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 21 डिसेंबरला फेटाळण्यात आला. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला होता. मात्र, सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित (रद्द) करण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तो राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यावर येत्या दोन-चार दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. हा ठराव रद्द झाल्यावर महापालिका आयुक्त राज्य सरकारच्या परवानगीने या रस्त्याचे विकसन करू शकतात. 

कात्रज- कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण 20 वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते; परंतु, त्यासाठी प्रकल्प अहवालही तयार झालेला नव्हता. त्या विषयात केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घातल्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला असून, लवकरच त्याच्या विकसनाचे काम सुरू होईल. त्यासाठी माझा पाठपुरावा कायमच राहणार आहे. या रस्त्यामुळे शहरावरील जड वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. 
- आमदार योगेश टिळेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com