सामाजिक समतेच्या लढाईसाठी साहित्यिकांनी पुढे यावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पंजाबी साहित्य संमेलन हे एक नवे पाऊल आहे. एकमेकांना एकत्र आणण्याचा नवा अध्यायच या निमित्ताने रचला गेला. तीन दिवसांपासून सुरू असलेले हे संमेलन आता संपले असले तरी वेगवेगळ्या कामांमधून एकत्र आणण्याची चळवळ सुरूच राहील. हाच या संमेलनामागचा उद्देशही होता.
- सुरजितसिंग पातर, संमेलनाध्यक्ष

पुणे : ""सामाजिक समतेची लढाई अजून पूर्ण झालेली नाही. या लढाईसाठी साहित्यिकांनी पुढे यावे. कारण शब्दांतच एकतेची मोठी ताकद आहे,'' असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी येथे व्यक्‍त केले.

"सरहद'तर्फे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात शिंदे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, संमेलनाध्यक्ष सुरजितसिंग पातर, पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जसपाल सिंग, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, "वात्रटिका'कार रामदास फुटाणे, "सरहद'चे संस्थापक संजय नहार, भारत देसडला, संतसिंग मोखा उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ""साहित्यिकांनी समाजाचे दु:ख समजून घेतले पाहिजे. दु:खावर मात करून जीवन जगण्याची नवी प्रेरणा वाचकांना साहित्यातून मिळते. त्यामुळे साहित्यिकांचा विचार महत्त्वाचा आहे. शेवटी वेगवेगळ्या प्रयत्नांतून देशाला पुढे घेऊन जाणे, हेच अधिक महत्त्वाचे आहे.'' घुमानमध्ये मराठी भाषेचे संमेलन झाले; पण इथे पंजाबी भाषेचे संमेलन आयोजित करणे, हे खूप अवघड काम होते. ते पेलले गेले. हा ऐतिहासिक क्षण आहे. अशा घटनांमधूनच पंजाब-महाराष्ट्राच्या एकतेला नवे बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

हजारे म्हणाले, ""माझे ते माझे आणि तुझेही माझेच, ही वृत्ती समाजात दिवसेंदिवस वाढत आहे. या वृत्तीमुळे अनेकांची रात्रीची झोप उडाली आहे. दिवसभर पैशांचा पाठलाग केला जात आहे. आपल्याला शेवटी जाताना सोबत काहीही घेऊन जायचे नाही. हे अंतिम सत्य असले तरी हा पाठलाग काही थांबायला तयार नाही. समाजाचे हे चित्र बदलू शकते ते केवळ साहित्याच्या बळावर. वाचनातून नवनवे विचार मिळत जातात. दृष्टी विशाल होत जाते.''

दरम्यान, डॉ. जसपाल सिंग, पर्यावरणतज्ज्ञ बलवीर सिंग सच्चेवाल यांना "विश्‍व पंजाबी गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला; तर ज्येष्ठ पत्रकार जगदीशसिंग दर्दी, नाट्यकलावंत प्राणकिशोर सबरवाल, रणविंदर सोहिल, डॉ. गुरुमोहनसिंग वालिया, अभिनेत्री सतींदर सत्ती यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दीपक बाली, शिवकुमार सलोजा यांनी सूत्रसंचालन केले.

पंजाबी साहित्य संमेलन हे एक नवे पाऊल आहे. एकमेकांना एकत्र आणण्याचा नवा अध्यायच या निमित्ताने रचला गेला. तीन दिवसांपासून सुरू असलेले हे संमेलन आता संपले असले तरी वेगवेगळ्या कामांमधून एकत्र आणण्याची चळवळ सुरूच राहील. हाच या संमेलनामागचा उद्देशही होता.
- सुरजितसिंग पातर, संमेलनाध्यक्ष

माझ्यावर साहित्यकृतींचा मोठा प्रभाव
""एका टप्प्यावर आत्महत्या करण्याचा विचार मनात डोकावला; पण संतसाहित्य हातात पडले आणि माझे विचारच पूर्णपणे बदलून गेले. आपले जगणे समाजाच्या, देशाच्या उपयोगासाठी असले पाहिजे, हा विचार मला साहित्यातूनच मिळाला. त्यामुळेच सामाजिक क्षेत्रात धडपड करत आहे. माझ्यावर आणि माझ्या आजवरच्या वेगवेगळ्या कामांवर विविध साहित्यकृतींचा मोठा प्रभाव आहे. आजवर करोडो रुपयांचे पुरस्कार मला मिळाले; पण जवळ काहीही नाही. सगळे पैसे गरजू लोकांना देऊन टाकले. असे संस्कारसुद्धा साहित्यातूनच मिळाले,'' असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

Web Title: writers shall come forward for equality