MPSC : एमपीएससीच्या हलगर्जीपणामुळे उमेदवारांवर अन्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSC : एमपीएससीच्या हलगर्जीपणामुळे उमेदवारांवर अन्याय

पुणे : राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पुन्हा एकदा उत्तरतालीका चुकवली होती. एमपीएससीच्या पिच्युटरी ग्रंथीसंदर्भातील चुकीच्या उत्तरांसाठी १८ विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, अन् न्यायदेवतेने उमेदवारांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना मुख्य परीक्षेत बसण्याची परवानगी दिली. मात्र, या न्यायापासून याचिकाकर्ता नसलेले शेकडो विद्यार्थी वंचित राहीले आहे. मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी एमपीएससीने फक्त याचिकाकर्त्या उमेदवारांनाच गुरुवारी (ता.१५) दुपारी तीन पर्यंतची मुभा दिली. त्यामुळे उत्तर बरोबर असूनही इतर उमेदवारांना न्यायालयाचे दरवाजे

ठोठावले नाही, म्हणून न्यायापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ‘सकाळ’ शी बोलताना राजेंद्र (नाव बदललेले) म्हणतो, ‘‘आयोगाच्या अयोग्य उत्तरामुळे माझ्यासारख्या शेकडो उमेदवारांवर अन्याय झाला आहे. काही उमेदवार सुरवातीला मॅटमध्ये गेले होते. तेथे आम्ही तज्ज्ञांच्या उत्तरांना आव्हान देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. हेच विद्यार्थी पुढे न्यायालयात गेले अन् असा निकाल समोर आला. आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही न्यायालयात जाऊ शकलो नाही. म्हणून आमच्यावर हा अन्याय का, एमपीएससीने उत्तरे बरोबर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत बसून द्यावे.’’ एमपीएससीच्या सदोष प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिकांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे करिअर पणाला लागत असून, तज्ज्ञांकडून उत्तरे चुकतातच कसे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

महत्त्वाची निरीक्षणे

- मागील काही वर्षांपासून एमपीएससीकडून सदोष प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका काढण्याचे प्रमाण वाढले

- चुकीच्या उत्तराच्या विरोधात ‘मॅट’मध्येही दिलासा मिळत नाही.

- एमपीएससीच्या वतीने नेमलेल्या तज्ज्ञांच्या ‘ज्ञान’वरच प्रश्नचिन्ह

- एका प्रश्नाच्या फरकामुळे हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहतात

- अभ्यास सोडून उमेदवारांना न्यायालयांच्या पायऱ्या झिझवाव्या लागतात

- अभ्यासाबरोबरच उमेदवारांचे आर्थिक नुकसान