सांस्कृतिक कार्यक्रम अन्‌ रंगरंगोटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

पुणे : अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळासाठी शहरातील सर्व चर्चमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. स्वच्छता, रंगरंगोटी, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईसह नावीन्यपूर्ण गोष्टींना चर्चमध्ये प्राधान्य दिले जात आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाताळाच्या प्रार्थनेचीही तयारी सुरू आहे.

पुणे : अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळासाठी शहरातील सर्व चर्चमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. स्वच्छता, रंगरंगोटी, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईसह नावीन्यपूर्ण गोष्टींना चर्चमध्ये प्राधान्य दिले जात आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाताळाच्या प्रार्थनेचीही तयारी सुरू आहे.

डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासूनच सगळ्यांना नाताळाचे वेध लागतात. दरवर्षीपेक्षा यंदा चर्च व चर्चचा परिसर अधिक सुंदर व देखणा कशा पद्धतीने करता येईल, यादृष्टीने चर्चच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. नाना पेठ, रास्ता पेठ, वडगाव शेरी, पुणे स्टेशन, खडकी, नळ स्टॉप, हडपसर, मुंढवा, घोरपडी, लष्कर, बोपोडी, दापोडी या परिसरातील चर्चमध्ये स्वच्छता व रंगरंगोटीच्या कामांना डिसेंबरच्या प्रारंभापासूनच सुरवात झाली आहे. चर्चच्या सभासदांच्या मुलांसाठीही येशुच्या जीवनावर आधारित नाटिका, कॅरोल्स फेस्टिव्हल, चांदण्या तयार करणे यांसारखे उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे.

चर्चच्या बाह्य सजावटीबरोबरच अंतर्गत भागामध्ये येशूच्या जीवनावर आधारित देखावे तयार केले जात आहेत. हे देखावे अधिक आकर्षक, चांगले व सामाजिक संदेश देणारे कसे असतील, यादृष्टीनेही युवक-युवती प्रयत्न करत आहेत. काही चर्च आपले अमृतमहोत्सवी वर्ष, शताब्दी, शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरे करत आहेत. त्यानिमित्त खास वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचेही चर्चने आयोजन केले आहे. काही चर्चच्या शाळांमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमांची विद्यार्थ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

शहरातील ख्रिस्ती कुटुंबांमध्येही आनंदोत्सवाला उधाण आले आहे. घरामध्येही स्वच्छता, रंगरंगोटी, नवनवीन वस्तू, कपडे खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. तर महिला घरामध्ये फराळ करण्यामध्ये गुंतल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. लहान मुलांचे समूह तयार करून त्यांना घरोघरी जाऊन ‘कॅरोल्स’ सादरीकरणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी चर्चच्या तरुण, ज्येष्ठ सदस्यांपासून ते चर्चचे धर्मगुरूही युवकांना मार्गदर्शन करत आहेत.

Web Title: x'mas in pune