युती व आघाडीत बिघाडीचे वर्ष

politics
politics

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने सरते वर्ष पक्षांतराचे म्हणावे लागेल. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक दलबदल 2016 मध्येच आणि ते सुद्धा वर्ष सरताना झाले. भाजप आणि आरपीआय वगळता इतर सर्वच पक्षांत जावक,तर भाजपमध्ये फक्त मोठी आवक झाली. आगामी वर्षाच्या पूर्वार्धात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेससह (एनसीपी) सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या दृष्टीने 2016 निवडणूक तयारीचेच वर्ष ठरले. त्यामुळे वर्ष संपताना मोठी राजकीय उलथापालथ झाली. युती व आघाडीत बिघाडी झाली.

राज्यात सत्तेत असलेले शिवसेना आणि भाजप उद्योगनगरीत विरोधी बाकावर आहे. तर आघाडीतील कॉंग्रेसचीही तशीच स्थिती आहे. या वर्षात युती व आघाडीत राज्य पातळीवर जसा तणाव वाढला, त्याला पिंपरी-चिंचवडही अपवाद राहिले नाही. रामनगर येथील पोटनिवडणुकीमुळे,तर युतीत संघर्ष उडाला. तर, वर्ष संपताना एनसीपीने कॉंग्रेसचे सात नगरसेवक फोडल्याने आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत युती वा आघाडी होण्यातही सरत्या वर्षाने व्यतत्य आणला. त्यामुळे अडीच महिन्यावर आलेली पालिका निवडणूक आणखी रंगतदार झाली असून त्यात रंग भरण्याचे काम 2016 ने चोखपणे बजावले आहे.

राजकीय क्षेत्रामध्ये शहरात खऱ्या अर्थाने उलथापालथ 2016 च्या उत्तरार्धात झाली. त्यात सत्ताधारी एनसीपीसह कॉंग्रेसला जोर का धक्का... बसला.एकूण 18 विविध पक्षांच्या नगरसेवकांनी या वर्षातील शेवटच्या तीन महिन्यांत पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात केले. त्यात सर्वाधिक सात नगरसेवक कॉंग्रेसचे असून त्याखालोखाल पाच एनसीपीचे आहेत. एनसीपीचे नगरसेवक भाजपने खेचले, तर कॉंग्रेसचे एनसीपीने ओढले. सत्ताधारी पक्षासह विरोधी बाकावरील भाजप आणि आरपीआय वगळता कॉंग्रेस, मनसे, शिवसेना आदी सर्व पक्षांचे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी पक्षांतर केले. आरपीआयच्या एकमेव नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे पक्षाचा किल्ला एकहाती लढवीत आहेत. भाजपचे तीन नगरसेवक असून त्यांची संख्या कायम राहिली असून उलट त्यांच्या दिमतीला इतर पक्षांतील नगरसेवकांची फौज येऊ घातली आहे.

भोसरी पक्षांतराचा केंद्रबिंदू पक्षांतराची मोठी व खरी सुरवात भोसरीतून झाली.तेथील एनसीपीचे नगरसेवक व अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एनसीपीतील पाच व इतर चार अशा नऊ नगरसेवकांनाही भाजपमध्ये आणले. त्यात अपक्ष, मनसे, शिवसेना आदीचा समावेश होता.त्यामुळे पहिला व मोठा धक्का एनसीपीला बसला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत एनसीपीने निम्मी कॉंग्रेस फोडली. त्याच्या सात नगरसेवकांना आपल्याकडे आणले. मात्र, एनसीपीला आणखी एक मोठे खिंडार भोसरीनंतर आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पडणार आहे. त्याचे संकेत 2016 मध्येच मिळाले आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे सत्ताधारी एनसीपीतील काही समर्थक नगरसेवकही भाजपच्या वाटेवर आहेत. ते नव्या वर्षात कधीही प्रवेश करण्याची शक्‍यता आहे.

भाजप आणि एनसीपी संघर्ष टोकाला युती पक्षात मावळत्या वर्षात जसा शहरात तणाव वाढला, तसा तो युतीतील भाजप आणि सत्ताधारी एनसीपीमध्येही प्रचंड प्रमाणात निर्माण झाल. एनसीपीवर भाजपने भ्रष्टाचाराच्या फैरीवर फैरी झाडल्या. त्यामुळे सत्ताधारी पक्ष घायाळ झाला. नंतर या राजकीय टीकेची पातळी खूपच खाली आली.वैयक्तिक पातळीवर हीन आरोप झाले. वर्षाच्या शेवटी त्याने टोक गाठले. अडीच महिन्यावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीतून भाजप व एनसीपीमध्ये हे आरोप, प्रत्यारोप झाले.

वर्षअखेरीस प्रचारही सुरू पालिकेची मार्च 2017 मध्ये निवडणूक होणार आहे. त्याच्या तयारीचे वर्ष 2016 ठरले. सत्ताधाऱ्यांनी विविध कामांची भूमिपूजने आणि उद्‌घाटनांचा सपाटा लावला. तर, विरोधकांनी व त्यातही भाजपने या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. पुढील वर्षाच्या सुरवातीस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र, त्याची तयारी या वर्षातच अनेकांनी सुरू केली. शिवसेना आणि एनसीपीने,तर इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यातील अनेकांनी तिकिटाची वाट न पाहता घरटी प्रचारही शेवटच्या महिन्यात सुरू केला आहे. समाधानाची आणि अभिमानाची बाब म्हणजे यावर्षीही शहरात आणि त्यातही पालिकेत महिलाराज पाहायला मिळाले. महापौरांसह बहुतांश समित्यांच्या सभापती व प्रभाग अध्यक्षपदी महिलाच विराजमान झाल्याने 2016 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील पन्नास टक्‍यापेक्षा अधिक आरक्षण पिंपरी-चिंचवडमध्ये पाहावयास मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com