‘पिफ’मध्ये यंदा सात मराठी चित्रपट

‘पिफ’मध्ये यंदा सात मराठी चित्रपट

पुणे - सतराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपटांच्या नावांची घोषणा शुक्रवारी महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ‘पिफ’चे आयोजन १० ते १७ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ ही या वर्षीच्या महोत्सवाची थीम आहे. पटेल म्हणाले, की ‘मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिताला, भोंगा, चुंबक, बोधी, दिठी हे सात मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागात दाखविण्यात येतील. याशिवाय दिग्दर्शक गोन्जालो जस्टिनिॲनो यांचा ‘डॅम किड्‌स’ हा चित्रपट ‘पिफ’ची ‘ओपनिंग फिल्म’ आहे. यंदाच्या थीमचा एक भाग म्हणून श्‍याम बेगेनल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ आणि रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

देश-विदेश विभागात हंगेरीचे ४, अर्जेंटिनाचे ६ व टर्कीचे ३ चित्रपट दाखविण्यात येतील. विद्यार्थी स्पर्धात्मक चित्रपट विभागात या वर्षी विविध देशांतून ३१७ चित्रपटांची नोंदणी झाली होती. यापैकी काल्पनिक चित्रपट विभागात सहा, तर ॲनिमेशन विभागात सोळा निवडक चित्रपट दाखविण्यात येतील. भारतासह सात देशांतील एकूण आठ तज्ज्ञ परीक्षक चित्रपटांचे परीक्षण करणार आहेत. महोत्सवादरम्यान आणखी एक आकर्षण म्हणजे ‘पिफ फोरम’चे आयोजन केले आहे. ज्यात ‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ यावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. विजय स्मृती व्याख्यान अंतर्गत पटकथालेखक कमलेश पांडे यांचे व्याख्यान होईल. या वर्षी ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सिटी प्राइड कोथरूड येथील प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिले आहे. तसेच, महोत्सवाच्या मुख्य रंगमंचाला पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.  

‘पिफ फोरम’मधील आकर्षण : 
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे व्याख्यान 
दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांचे व्याख्यान 
चित्रपट निर्माते बायजू कुरूप, विवेक सुवर्णा व छायाचित्रकार 
नीरज गेरा यांचे व्याख्यान
‘डॉन स्टुडिओ’चे सादरीकरण
‘तपस’ बॅंडचे सादरीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com