मनोरुग्णालयातील बरे झालेले रुग्ण मुख्य प्रवाहात 

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

येरवडा - येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी आता राज्याचे आरोग्य व सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. बरे झालेल्या रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवले जाणार आहे. रुग्णांना थेट समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यामागचा हेतू असल्याची माहिती आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक नितीन बिलोलिकर यांनी दिली. 

येरवडा - येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी आता राज्याचे आरोग्य व सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. बरे झालेल्या रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवले जाणार आहे. रुग्णांना थेट समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यामागचा हेतू असल्याची माहिती आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक नितीन बिलोलिकर यांनी दिली. 

बिलोलिकर म्हणाले, ""रुग्णालयात सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यापैकी अनेकांना त्यांचे नातेवाईक घेऊन जात नाहीत. काही रुग्ण अनाथ तर काहींचा पत्ताच सापडत नाही. बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा मनोरुग्णांबरोबर ठेवणे संयुक्तिक ठरत नाही. त्यासाठी सामाजिक न्याय व आरोग्य विभागाने त्यांच्यासाठी पुनर्वसन प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये मनोरुग्णालयाच्या सीमाभिंतीच्या बाजूने सामाजिक न्याय विभाग नवीन कक्ष बांधणार आहे. त्यामध्ये बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.'' 

या कक्षात रुग्णांना विविध व्यवसायाभिमुख कौशल्य देऊन त्यांना उद्योगात गुंतविण्यात येणार आहे. तेथे कागदी व कापडी पिशव्या तयार करणे, आकाशकंदील, पणत्या इतर शोभेच्या वस्तू बनविण्यावर भर असणार आहे. यासह त्यांना खेळ, मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रस्त्याच्याकडेला कक्ष असल्यामुळे त्यांचा समाजातील सर्व घटकांचा संपर्क होईल, अशी त्यामागची संकल्पना असल्याचे बिलोलिकर यांनी सांगितले. 

मनोरुग्णालयात पूर्वी डॉ. हमीद दाभोलकर चालवीत असलेल्या "देवराई' मध्ये रुग्णांना ठेवण्यात येत होते. आता रुग्ण पुनर्वसन प्रकल्पात सामाजिक न्याय विभाग नवीन कक्ष बांधून देणार आहे. आरोग्य विभाग वैद्यकीय तज्ज्ञांसह मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून देणार आहे. 
- डॉ. अभिजित फडणीस, अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय 

मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांसाठी "हाफ वे होम' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. नवीन बांधण्यात येणारा कक्ष हा रुग्णांसाठी शेल्टर होमसुद्धा असणार आहे. या कक्षात समाजातील सर्व सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने रुग्णांचे पुनर्वसन शक्‍य होणार आहे. 
- डॉ. संजय देशमुख, प्रभारी उपसंचालक, आरोग्य सेवा. 

Web Title: Yerawada Regional Mental Hospital